नाशिक – स्मार्ट फोनचा वापर वाढत असल्याने त्याचे धोकेही वाढत आहेत. नाशकातील एका व्यक्तीने डेटिंग अॅपवर महिलेशी केलेली मैत्री चांगलीच महागात पडली आहे. या व्यक्तीची तब्बल १९ लाखांची फसवणूक झाली. त्याने तातडीने नाशिक सायबर पोलिसांशी सपंर्क साधला. अखेर पोलिसांनी याचा छडा लावत २ जणांना दिल्लीतून अटक केली आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिक्टर डॉमिनीक ओकोन (४२, रा. उत्तमनगर, पीलर क्रमांक ९६४, नवी दिल्ली) आणि पवनकुमार हरकेश बैरावा (२४, रा. झुणी बस्ती, बढोसरा, दिल्ली) अशी या गुन्ह्यातील अटक संशयित आरोपींची नावे आहेत. शहरात राहणाऱ्या आणि तरूण असलेल्या फिर्यादीची ओळख ट्रुली मॅडली या डेटींग अॅपवर मोनिका सिंग नावाच्या महिलेशी झाली होती. वास्तविक ही व्हर्चुअल फ्रेंडशीपच नायजेरीन फ्रॉडची सुरुवात होती.
अॅमस्टरडॅम, नेदरलॅण्ड येथे राहत असल्याने बोरटॅड फार्मासिटीकल नावाच्या कंपनीमध्ये असिस्टंट प्रोडक्शन अनॅलीस्ट पदावर काम करीत असल्याचा देखावा मोनिकाने उभा केला. फिर्यादी तिच्या या देखाव्याला भुलला. मोनिका काम करते त्या कंपनी व्हायरोलॉजीकल आजारांचे उपचार करण्यासाठी ऑरनिमा हर्बल ऑईल हे कच्चे तेल वापरले जात असल्याचे फिर्यादीला सांगण्यात आले.
इंडोनेशीयात मिळणारे हे तेल कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात राहणाऱ्या राजेश नंदी याच्याकडे मिळते, असे मोनिकाने फिर्यादीस पटवून दिले. हे तेल तु निर्यात केले तर मोठ्या प्रमाणावर कमिशन मिळेल. त्यातून तुझा आणि माझाही फायदा होईल, असे मोनिकाने सांगितले. त्यानुसार फिर्यादीने नंदीच्या मोबाईलवर संपर्क साधून सहा लीटर तेल मागितले. या फ्रॉडमध्ये सहभागी असलेल्या बर्नाड फाबीयन नावाच्या व्यक्तीने २६ ऑक्टोबर रोजी बेंगलोर येथे हे तेल तपासले. तसेच फिर्यादीस हे तेल योग्य असल्याचा निर्वाळ कंपनी तेल खरेदी करेल, असे आश्वासन दिले. त्यानुसार फिर्यादीने वेळोवेळी १९ लाख सहा हजार रूपये खर्च करून दोनशे लिटर तेल खरेदी केले. मात्र, यानंतर सर्वच आरोपींनी फिर्यादीशी संपर्क तोडल्याचे पोलिसांनी सांगितले.
संशयितांना कोर्टाने ७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.