नंदुरबार – नंदुरबार जिल्ह्यासाठी ११ महिनाच्या कालावधीच्या ‘डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट फेलोशिप’ साठी २८ जुलैपर्यंत ४२३६ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातून छाननी अंती १०६५ उमेदवाराची निवड पहिल्या टप्प्यातील निवड प्रक्रीयेसाठी करण्यात आली आहे.
छाननी प्रक्रीयेत बारावीत ६० टक्क्यापेक्षा अधिक गुण प्राप्त झालेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच खेळ, वक्तृत्व-वादविवाद, सांस्कृतीक कार्यक्रम, कला, सामुदायिक सेवा, विद्यार्थी परिषदेचा प्रतिनिधी यापैकी कोणत्याही प्रकारात सहभाग नसलेल्या उमेदवारांची निवड पहिल्या टप्प्यातील मुलाखतीसाठी करण्यात आलेली नाही. पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या उमेदवारांना समिती सदस्यांच्या उपस्थितीत दूरध्वनीवरील समूह चर्चा आणि वैयक्तिक मुलाखतीत सहभाग घेता येणार आहे. विविध समिती सदस्यांद्वारे पहिल्या टप्प्यातील कार्यवाही करण्यात येत आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अधिक माहितीसाठी ९८०४२५९१५०, ९८११३४४५७३, ७८२९०९९९३८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.