नाशिक – जिल्ह्याला २५ मेट्रिक टन ऑक्सिजन म्हणजे ४ हजार सिलेंडर दररोज लागणार असून विल्होळी येथील ऑक्सिजन प्लँटद्वारे २ हजार ऑक्सिजन सिलिंडर पुरविण्यात येणार आहे. परंतु डिसेंबर व जानेवारी महिन्यात कोरोनाची लाट येण्याची शक्यता असल्याने जिल्ह्याची आवश्यकता २५ मेट्रिक टन असली तरी ५० मेट्रिक टनाची क्षमता ठेवणे आवश्यक असून त्याप्रमाणे नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
ते आज आंबेबहुला रस्त्यावर असलेल्या विल्होळी येथील जाधव गॅसेस ऑक्सिजन प्लँट उदघाटन समारंभात बोलत होते. कोरोनाबधितांवर वेळेवर उपचार होणेसाठी ऑक्सिजनची आवश्यकता लक्षात घेता जाधव गॅस प्लँटने एका दिवसात 2 हजार सिलेंडर भरण्याची क्षमता असलेले युनिट उभे करून कौतुकास्पद काम केले आहे; असे भुजबळ म्हणाले. लॉकडाऊन काळातही सगळे बंद असतांनाही समाजिक भान ठेवून अतिशय मेहनतीने श्री.जाधव यांनी या ऑक्सिजन प्लँट उभारणी केली आहे. भविष्यात या प्रकल्पामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होणार नसून प्रत्येक रुग्णाला पुरेसा ऑक्सिजन मिळणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.