मुंबई/सोलापूर – ग्लोबल टिचर्स अॅवॉर्ड विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसे व्हॉटसअप स्टेटस त्यांनी ठेवले असल्याचे वृत्त अनेक माध्यमांनी दिले आहे. या वृत्तामुळे मोठी खळबळ उडाली आहे. कारण, गेल्या दोन ते तीन दिवसात ते मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्यासह अनेक मंत्री, सचिव आणि अन्य मान्यवरांच्या संपर्कात होते.
लक्षणे दिसत असल्याने मी कोरोना चाचणी केली. ती पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनीही कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन डिसले यांनी केले आहे. तब्बल ७ कोटी रुपयांच्या या अॅवॉर्डची घोषणा झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते सेलिब्रेटी झाले आहेत. त्यामुळे त्यांना भेटणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली. तसेच, राज्य सरकारने त्यांना मुंबईत बोलवून त्यांचा सत्कार केला. त्यावेळी अनेक मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल, सचिव आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. आता डिसले गुरुजी कोरोना बाधित झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या या सर्वांना कोरोना चाचणी करुन घेणे बंधनकारक झाले आहे.