ओझर येथील हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमधील (एचएएल) कर्मचारी हेरगिरी प्रकरणात सापडल्यानंतर नाशिकमधील संरक्षण संस्थांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात प्रकाश टाकणारी ही वृत्तमालिका….
इंडिया दर्पण विशेष वृत्तमालिका – सुरक्षेचे तीनतेरा – भाग ४
डिफेन्स इंटेलिजन्सचे पथकही नाशकात?
भावेश ब्राह्मणकर, नाशिक
एचएएलमधील हेरगिरी प्रकरणाची संरक्षण मंत्रालयानेही गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळेच संरक्षण विभागाचे नाक, कान आणि डोळे समजल्या जाणाऱ्या डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीचे (डीआयए) पथकही नाशकात आल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. भारतीय व्यक्तीने गोपनिय माहिती शत्रू राष्ट्राला किंवा तेथील गुप्तहेर संस्थेला देणे ही बाब राष्ट्र हिताविरुद्ध असल्याने डीआयएनेही तपासाची चक्रे गतिमान केली आहेत.
डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी हा संरक्षण मंत्रालयाचा गुप्तहेर विभाग आहे. डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स या विभागाअंतर्गत तो काम करतो. लष्कर, हवाई दल, नौदल या तिन्ही संरक्षण दलांचे कान, नाक व डोळे म्हणूनही या एजन्सीकडे पाहिले जाते. देशाच्या अंतर्गत व बाह्य सुरक्षेशी संबंधित विविध प्रकारच्या गुप्तहेर संघटनांशी ही एजन्सी सातत्याने संपर्कात राहते, समन्वय ठेवते. देशाचे सार्वभौमत्व अबाधित राखणे आणि देशविघातक कारवायांना लगाम घालण्यासाठी ही एजन्सी अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने काम करीत असते.
अत्याधुनिक तंत्रज्ञानासह हेरांचे मोठे जाळे एजन्सीकडे आहे. त्याद्वारेच ही एजन्सी संरक्षण मंत्रालय, चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस), संरक्षण मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) या सर्वांना महत्त्वाचे इनपुट देण्याचे काम करते. उपग्रहांपासून विविध प्रकारच्या माध्यमातून येणाऱ्या माहितीचे विश्लेषण करणे, विविध प्रकारच्या गोपनीय संदेशांची उकल करणे आदी महत्वपूर्ण कामे एजन्सीकडून केली जातात. तिन्ही सैन्य दलांमध्ये समन्वय आणि योग्य त्या वेळी त्यांना विविध प्रकारची माहितीही एजन्सी देत असते. एजन्सीचे मुख्यालय नवी दिल्लीतील कॅबिनेट सचिवायलयात आहे.
ओझर एचएएलमधील हेरगिरी प्रकरणाची डीआयएनेही गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे या तपास कार्यात एजन्सीही सक्रीय झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. एचएएलचा कर्मचारी दीपक शिरसाठ याचा ताबा सध्या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) आहे. त्याची सध्या कसून चौकशी सुरू आहे. त्याच्याकडून हस्तगत केलेल्या स्मार्ट फोन, मोबाईल, सिमकार्ड, मेमरी कार्ड आदींचे तांत्रिक विश्लेषण सध्या सुरू आहे.
हनीट्रॅपद्वारे शिरसाठला अडकविण्यात पाकिस्तानी युवतीला यश आले. त्याने नक्की काय माहिती दिली, त्याला ती कुठून व कशी मिळाली, एचएएलमध्ये त्याचा वावर कसा आणि किती होता यासह विविध प्रकारच्या बाबी चौकशीत गांभिर्याने घेतल्या आहेत. त्याअनुषंगाने डीआयएचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक नाशकात आल्याचे सांगण्यात येत आहे. या पथकाने एचएएलमध्येही तपास केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. देशद्रेहाशी संबंधित हे तपासकार्य असल्याने यासंदर्भात कुठलीही अधिकृत माहितीची वाच्यता केली जात नाही किंवा माध्यमांसमोर मांडली जात नाही. शिरसाठकडून मिळणारी माहिती, त्याची शहानिशा आणि त्यापुढील तपास यासंदर्भात डीआयए सक्रीय असल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. सुरक्षा व्यवस्था कशी भेदली गेली आणि देशास घातक कुठल्या बाबी या सर्व प्रकारात घडल्या आहेत, याचा माग डीआयएकडून काढला जात आहे.
(क्रमशः)