नाशिक – महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे डिप्लोमा इंजिनीअरिंगसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. १० सप्टेंबर पर्यंत दुसरी मुदतवाढ दिली असतांना २४ हजार जागांसाठी फक्त १३ हजार अर्ज दाखल करण्यात आल्याने तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी अर्ज करू इच्छिणारे विद्यार्थी २१ सप्टेंबर पर्यंत अर्ज करू शकतात.
इंजिनिअरिंगला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल दिवसेंदिवस कमी होत आहे. त्याच अनुषंगाने तंत्रशिक्षण मंडळातर्फे रिक्त जागांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज केल्यावर लगेचच मूळ कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. त्यानंतर २४ सप्टेंबरला तात्पुरता गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. या संदर्भात काही आक्षेप असल्यास विद्यार्थ्यांना २५ ते २७ सप्टेंबर दरम्यान तक्रार नोंदवू शकतात. यानंतर २९ सप्टेंबरला पहिली यादी जाहीर होणार आहे. नाशिक विभागात एकूण २४ हजार १६० जागा रिक्त असतांना १० सप्टेंबर पर्यंत फक्त १४ हजार अर्ज प्राप्त झाले असल्याने तंत्रशिक्षण मंडळाने मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे. www.dtemaharashtra.gov.in या वेबसाईटवर अधिक माहिती उपलब्ध आहे.