नाशिक – डीजीपीनगर क्रमांक एक परिसरातील टागोरनगरच्या कॉर्नरवर अज्ञात दुचाकीस्वार हल्लेखोरांनी शनिवारी (१९ सप्टेंबर) रात्री अकरा वाजेच्या सुमारास गोळीबार केला. या गोळीबारात बाबा शेख ठार झाला असून तो सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे.
उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील डीजीपीनगर वसाहत रात्री झालेल्या गोळीबाराने हादरली. नाशिकरोड बाजूकडून डीजीपी नगरमार्गे जाणाऱ्या बाबा वर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात त्याच्या डाव्या बरगडीला गंभीर दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. गोळीबारानंतर हल्लेखोर वडाळागावाच्या दिशेने पसार झाल्याचे काही नागरिकांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच तात्काळ उपआयुक्त विजय खरात, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकले यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बाबाला तात्काळ एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
डिजीपी नगर भागात बाबा शेख हा टीपू शेख याच्याबरोबर दुचाकीवरून वडाळागाव येथे जात होता. त्याचवेळी त्याच्या मागून येणाऱ्या दुचाकीवरील दोघांनी त्याच्यावर गोळी झाडली. गोळीबार झाल्याची माहिती नातेवाईकांना शेख याने दिली होती. पाठीत गोळी घुसल्याने जखमी बाबा शेख याला खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. बाबा शेख याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून पूर्ववैमनस्यातून त्याच्यावर गोळी झाडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मारहाण, हत्या, लूट, चोऱ्या, धमक्या देणे, दहशत पसरवणे अशा प्रकारचे गुन्हे त्याच्या नावावर दाखल आहेत. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे.