अक्षय कोठावदे, नाशिक
कोरोनाच्या संकटात आता महागाईने शिरकाव केला आहे. डाळींचे दर किलोमागे २० ते २५ रुपयांनी वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. विशेष म्हणजे, आगामी काही महिने डाळींचे दर चढेच राहण्याची चिन्हे असल्याने दिवाळ सण महागाईतच साजरा होणार आहे.
कोरोना विषाणूचे संकट, लॉकडाऊन याला तोंड देत असतानाच आता महागाईनेही डोके वर काढले आहे. काही दिवसांपूर्वी तेलाचे दर कडाडले असताना आता डाळींनाही महागाईची फोडणी मिळाली आहे. गेल्या काही दिवसातच डाळींचे दर तब्बल २० ते २५ रुपये प्रती किलोला वाढले आहेत. त्यामुळे प्रत्येक घरातील बजेटवर त्याचा परिणाम होत आहे.
बाजारात डाळींचा पुरवठा कमी आणि मागणी अधिक असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तर, यंदा विविध कारणामुळे डाळींचे उत्पादन फारशे झालेले नाही. तसेच, परदेशातून येणाऱ्या डाळीही यंदा लॉकडाऊनमुळे बाजारात येऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे मागणी व पुरवठ्यातील संतुलन बिघडले असल्याने डाळींचे दर वाढल्याचे जाणकारांनी सांगितले आहे. सध्या अधिक मास सुरू आहे. लवकरच नवरात्र, दसरा, दिवाळी हे सण येणार आहेत. मात्र, हे सर्व सण महागाईतच सर्वांना साजरे करावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा आणि दर आटोक्यात आणावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
डाळींचे दर असे (प्रति किलो)
डाळ सप्टेंबर ऑक्टोबर
तूरडाळ ९० ते ९५ ११० ते १२०
मूगडाळ ९५ ते १०० १०० ते ११०
हरभराडाळ ६४ ते ७० ७४ ते ८०
उडीदडाळ ९५ ते १०० ११० ते ११५
डाळींचे दर गेल्या काही दिवसात खुपच वाढले आहेत. मागणी अधिक आणि पुरवठा कमी यामुळे हे चित्र निर्माण झाले आहे. डाळींचे उत्पादनही यंदा कमीच आहे.
– सचिन मुसळे, व्यावसायिक