मुंबई – शहर परिसरात सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या चांगलीच वाढते आहे. मनोरंजन क्षेत्रालाही याचा फटका बसतो आहे. माधुरी दीक्षित जज्ज असलेल्या डान्स दीवाने ३ या शोमधील तब्बल १८ क्रू सदस्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे (एफडब्ल्यूआयसीई) महासचिव अशोक दुबे यांनी सांगितले की, या आठवड्यात शूटिंग सुरू व्हायच्या पूर्वीच हे क्रू मेम्बर्स पॉझिटव्ह आले होते. यात सेटवर काम करणारे, लाईटमॅन, कॅमेरा सांभाळणारे, सहाय्यक दिग्दर्शक, सहाय्यक कला दिग्दर्शक आणि काही स्पर्धकांचाही समावेश आहे.
पुढील शेड्यूल ५ एप्रिलचे असून ते नियोजित वेळापत्रकानुसार होणार असल्याचे ते म्हणाले. माधुरी दीक्षितसह तुषार कालिया आणि धर्मेश येलांडे या शो चे जज असून, या सर्वांची तब्येत ठीक असल्याचे दुबे म्हणाले. तर राघव जुयाल होस्ट आहे.
इंडिया टुडे ने दिलेल्या माहितीनुसार, या सगळ्या पॉझिटिव्ह मेंबर्सना तातडीने वैद्यकीय मदत दिली आहे. सध्या हे सारे क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच अन्य नियमांचे पालन होत आहे. सेट आणि अन्य जागांचे सॅनिटायझेशन सुरू आहे.
सध्या मनोरंजन क्षेत्रही कोरोनाच्या विळख्यात आले आहे. रणबीर कपूर, संजय लीला भन्साळी, मनोज वाजपेयी, कार्तिक आर्यन, सतीश कौशिक, आमीर खान, आर माधवन आदी पॉझिटिव्ह आले आहेत. रणबीरची टेस्ट आता निगेटिव्ह येऊन आता तो क्वारंटाईनमधून बाहेर आहे. तर आमीर खान देखील सध्या क्वारंटाईनमध्ये आहे. संजय लीला भन्साळीची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आलिया भट्ट ने देखील टेस्ट केली होती. पण ती निगेटिव्ह आली आहे.