निलेश गौतम, डांगसौंदाणे (ता. बागलाण)
काल मध्यरात्री गावाच्या वेशी जवळ असलेल्या सुलक्षण मळ्यात एक बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असले तरी या भागातील बिबट्यांचा उच्छाद सुरूच आहे. एक पकडला नाही तोच याच वस्तीवर काल सायंकाळी पुन्हा दोघा बिबट्यांच्या जोडीने दहशत माजविली सध्या सुलक्षण वस्तीतील शेतात राहणाऱ्या कुटुंबियांना भीतीच्या सावटाखाली राहावे लागत आहे. पश्चिम भागात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून यातच जंगलांना लागत असलेल्या आगीमुळे बिबटे सुरक्षित जागा शोधण्याच्या शोधात थेट गावाशेजारील शेत वस्तीमध्ये येत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या अनेक दिवसापासून या दिवसांपासून या परिसरातील उच्छाद मांडलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने नुकताच पिंजरा लावला होता .या पिंजऱ्यात बिबट्याची मादी अलगत अडकल्याने सूर्योदयाच्या आधीच बिबट्याची मादी वनविभागाने ताब्यात घेत अज्ञात स्थळी हलविले मात्र काल सायंकाळी पुन्हा याच ठिकाणी दोघा बिबट्याच्या जोडीने उच्छाद मांडल्याने सुलक्षण वस्तीतील शेतकरी कुटुंबे पुरते हादरले आहेत .फटाक्यांच्या आवाजाने या बिबट्यांना हुसकविण्यात आले. मात्र परिसरातील शेतकरी बिबट्याच्या दहशतीखाली कायम आहेत त्यांचे हक्काचे राखीव जंगलच आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याने व शिकारीच्या शोधात हे बिबटे सध्या शेतशिवारात मोठ्या प्रमाणावर दिसून येत असून रात्रीच्या वेळेस शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन शेतीची कामे करावी लागत आहेत. या परिसरातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होत असून वन विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.