डांगसौंदाणे, ता. सटाणा – पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी बुंधाटे चौफुलीवर रास्तारोको करीत कांदा निर्यातबंदी उठविण्याची मागणी केली. सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कांदा आंदोलनात परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत रास्ता रोको केला. यावेळी केंद्र सरकारचा निषेध करीत तात्काळ कांदा निर्यात बंदी मागे घेण्याची एकमुखी मागणी केली.
आंदोलनात माजी सरपंच डॉ सुधीर सोनवणे, निवृत्ती सोनवणे, साहेबराव बोरसे, पंढरीनाथ सोनवणे, राजेंद्र सोनवणे, अंबादास सोनवणे, शिवा बैरागी, शरद गायकवाड, कैलास खैरनार, दादा सोनावणे, नथु बोरसे ,आबा बोरसे आदी शेतकऱ्यांनी सहभाग घेतल रस्त्यावर कांदे ओतून केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला.
यावेळी शेतकरी धनंजय बैरागी यांनी शेतकऱ्यांच्या वतीने केंद्र सरकारच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करत ८० टक्के कांदा हा चाळीतच सडून गेला असून उर्वरित २० टक्के कांद्याला थोडाफार भाव मिळत असताना केंद्राने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न केला असे सांगितले.
संजय सोनवणे यांनी सांगितले की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सध्या आपला माल बाजार समित्यांमध्ये नेऊ नये. कांदा हा मोठ्या प्रमाणात चाळीतच सडत असून देशांतर्गत कांद्याचा ज्यावेळेस मोठा तुटवडा होईल त्यावेळी नक्कीच कांद्याचे दोन पैसे शेतकरी वर्गाला मिळतील. केंद्र सरकार कायमच शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नी विरोधात भूमिका घेत असते. केंद्राने कांदा निर्यात बंदी उठवली नाही तर यापुढेही कांदा आंदोलन हे शेतकऱ्यांच्या वतीने उभे केले जातील, असा इशारा त्यांनी दिला. सर्व शेतकऱ्यांनी यावेळी पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन देत केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला.