डांगसौंदाणे, ता. सटाणा – परिसरातील खरिपाच्या मका पिकाची पाहणी तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी आज (१७ सप्टेंबर) केली. तसेच शेतकरी वर्गाच्या समस्या जाणून घेतल्या. यावर्षी पीक फुलोरेच्या काळात जास्त पाऊस झाल्याने मका पिकात वाढ होऊनही पाहिजे तसे कणीस लागलेले नाहीत. त्यामुळे मका उत्पादनात मोठी घट होणार आहे. शेतकऱ्यांनी विविध कंपन्यांचे मका बियाणे पेरणी केली असून सर्वच मका बियाण्यांना उत्पादनात घट दिसून येत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी पवार यांनी तात्काळ भेट घेत संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांसी चर्चा केली. पीक तज्ज्ञांबरोबर चर्चा करून मार्ग काढण्याचा सल्ला यावेळी उपस्थित शेतकरी वर्गाला दिला. कृषी सहाय्यक रवींद्र कांबळे, शेतकरी अमोल सोनवणे, कैलास खैरनार, सचिन केल्हे, मोहन बागुल, गोविंद जाधव, प्रवीण बैरागी आदी शेतकरी यावेळी उपस्थित होते.