उत्कृष्ट तपास अधिकारी म्हणून केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पदक जाहीर
डांगसौंदाणे (ता. सटाणा) – येथील भूमीपूत्र उत्तमराव सोनवणे यांनी राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी बजावल्याने त्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने पदक जाहीर केले आहे. सोनवणे सध्या मुंबई रेल्वेमध्ये गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत. त्यांच्या कार्यकतृर्त्वाने परिसरात चैतन्याचे वातावरण आहे.
शेतकरी कुटुंबात जन्म झालेले उत्तमराव सोनवणे हे १९९२ च्या बॅचचे पोलिस अधिकारी आहेत. सध्या मुंबईमध्ये रेल्वे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. डिसेंबर २०१८ मध्ये भूज-दादर या सुपरफास्ट एक्सप्रेस मध्ये गुजरातची महिला दर्यादेवी चौधरी यांच्या हत्येचा तपास यशस्वीरित्या केला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मोहम्मद असलम शेख याने नोव्हेंबर २०१९ मध्ये बोरिवली येथे मानसी केळकर या वयोवृद्ध महिलेला लुटत मारहाण केली होती. त्यानंतर मुंबई सेंट्रल जवळ पोलिओग्रस्त महिला नगमा अन्सारी यांनाही शेख यानेच गाडीतून ढकलले होते. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून सोनवणे यांच्या नेतृत्वातील पथकाने शेख यास ओळखले. अखेर जानेवारी २०२० मध्ये शेख यास अटक करण्यात सोनवणे यांच्या पथकाला यश आले.
शेख हा वेळोवेळी गुन्ह्यात बदल घडवून आणण्यात तरबेज होता. तो कायम पोशाख व वेशभूषा बदलत गुन्हा करीत असल्याने त्याला पकडणे अवघड होते. त्याने सर्व गुन्ह्यात वापरलेली एकाच प्रकारची पॉलिथिन पिशवी व त्याची चालण्याची एकसारखी पद्धत हाच तपास कार्यात महत्त्वाचा पुरावा असल्याचे सोनवणे यांनी सांगितले आहे. एकट्या महिलांना लक्ष्य करायचा आणि त्यांना लुटण्यात तो तरबेज होता. रेल्वे कर्मचारी असल्याचे भासवत त्याने अनेक महिलांना गंडा घातल्याचे सोनवणे यांनी सांगितले.
डांगसौंदाणे गावातील ते एकमेव पोलिस अधिकारी आहेत. सोनवणे हे १९९२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलिस दलात दाखल झाले आहेत. सोनवणे यांनी नागपूर, जळगा, भोईसर, ठाणे विभागात पोलिस अधिकारी म्हणून कामगिरी बजावली आहे. पोलिस दलातील आक्रमक आणि तितकेच हुशार अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक गुन्ह्यांच्या तपासात त्यांनी ”उत्तम” कामगिरी केल्यामुळे पोलिस दलातील अनेक मानचिन्हे त्यांनी प्राप्त केली आहेत. यानिमित्ताने गावाचा गौरव वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.