मुंबई – शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज देतानाच ठिबक सिंचनासाठी ८० ते ९० टक्के अनुदान देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे.
राहुरी (जि. अहमदनगर) येथे कृषिभूषण दत्तात्रय वने यांच्या शेतात झालेल्या कार्यक्रमात कृषिमंत्र्यांनी रिसोर्स बँकेतील शेतकरी बांधवांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासह राज्यभरातून प्रयोगशील शेतकरी ऑनलाइन सहभागी झाले होते.
शेतीत प्रयोग करणारे शेतकरी चालते-बोलते विद्यापीठ असून त्यांच्या अनुभवातून व संकल्पनेतून फलित झालेल्या मॉडेलचा राज्यातील इतर शेतकऱ्यांनादेखील लाभ व्हावा यासाठी शेतकऱ्यांची रिसोर्स बॅंक तयार करण्यात आली आहे. ऊर्जा विभागाशी समन्वय साधून शेतीकरिता दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. माझी माय-वडील शेतात राबायचे. शेतकऱ्याच्या कुटुंबात मुलाच्या शिक्षणासाठी पैसे जमा करताना जे कष्ट करावे लागतात त्या साऱ्याचा मी जवळून अनुभव घेतल्याची आठवण कृषिमंत्र्यांनी यावेळी सांगितली.
प्रयोगशील शेतकऱ्यांसोबत शेतात प्रत्यक्ष प्रयोग केलेल्या नाविन्यपूर्ण बाबींवर आस्थेवाईकपणे संवाद साधत शेती पीक घेण्याबरोबरच विक्री करण्याची कला अंगीकृत असणे देखील महत्त्वाचे आहे, त्यामुळे ‘विकेल ते पिकेल’ या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेच्या माध्यमातून वाटचाल करणे शेतकऱ्यांच्या हिताचे ठरणार असल्याचे श्री. भुसे यांनी सांगितले.
शेतकरी बांधवांनी यावेळी आपल्या काही संकल्पना मांडल्या. त्याबद्दल कृषी विभाग आपली भूमिका नक्कीच साकारेल. कारण एकमेकांच्या सहयोगाने, संकल्पेने आपल्याला कृषी क्षेत्राचा गाभा भक्कम करायचा आहे. काही शेतकऱ्यांनी आपल्या समस्याही मांडल्यात त्याही आपण येणाऱ्या काळात मार्गी लावू, असे कृषिमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
शेती आणि शेतकरी मुख्यमंत्र्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांच्या हिताचे जे करण्यासारखे आहे त्याकडे मुख्यमंत्र्यांचा कल असतो. म्हणून शहर असो किंवा ग्रामीण भाग जिथे जागा उपलब्ध होईल तिथे शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकाला कसा उपलब्ध होईल याकडे कृषी विभागाचा फोकस असणार आहे. ज्याद्वारे विक्रीतून शेतकऱ्यांना योग्य लाभदेखील घेता येईल.
वंदनीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाच्या माध्यमातून, शेतकऱ्यांचे गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून, साठवण क्षमता, शीतगृहे, माल वाहतूक, शेतमालावर प्रक्रिया यांना पाठबळ देण्याचे काम कृषी विभागाने हाती घेतलेले आहे. त्यासाठी उपाययोजना सुरू असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी रिसोर्स बॅंकेतील शेतकऱ्यांच्या विभागनिहाय प्रतिनिधींनी शेतात केलेल्या विविध प्रयोगांची माहिती दिली. राज्यातील अन्य शेतकऱ्यांना प्रशिक्षित करताना त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी मदत करण्याचे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले.