नाशिक – शहरातील कोरोना बाधितांची संख्या १६ हजारांपुढे गेली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेने आता आरोग्य सुविधा वाढविण्याचे काम सुरु केले आहे. याचाच एक भाग म्हणून एबीबी सर्कल जवळील ठक्कर डोम आणि सिडकोतील संभाजी स्टेडिअम येथे कोविड सेंटर कार्यन्वित केले जाणार आहे. या दोन्ही ठिकाणांची पाहणी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी शनिवारी केली.
संभाजी स्टेडियम व ठक्कर डोम येथे कोरोना कक्ष कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून त्या ठिकाणी विविध प्रकारच्या कामाच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील रुग्णांना बेडची संख्या अपुरी पडू नये या दृष्टीने मनपाच्या वतीने युद्धपातळीवर कामकाज सुरू आहे. त्यामध्ये कोरोना कक्षाच्या संख्येत वाढ करून त्यात बेडची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत.










