नवी दिल्ली ः तुम्ही जर मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर वापरत असाल, तुमचे फॉलोअर्सही चांगले असतील, तर तुम्ही आता पैसेसुद्धा कमवू शकता. तुम्हाला विश्वास वाटणार नाही. परंतु ट्विटरनं घोषणा केली आहे की, युजर्स आता फॉलोअर्सच्या माध्यमातून कमवू शकतात. ट्विटरनं दोन नव्या फिचर्सची घोषणा केली आहे.
या फिचर्सअंतर्गत आपल्या फॉलोअर्सना अतिरिक्त कंटेंट दाखवण्याची, समुहासाठी विशेष कंटेंट तयार करण्याची आणि समुहामध्ये सहभागी करून घेण्याची सुविधा युजर्सना मिळणार आहे. या फिचर्सविषयी विस्तारानं जाणून घेऊ या…
ट्विटरमध्ये दिसणारे हे दोन बदल त्या मॉडेलवरसुद्धा फिट बसू शकतात जे दुसऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यशस्वी आणि लोकप्रिय झाले आहेत. यापैकी एक असेल, सुपर फॉलो पेमेंट फिचर. ज्यामध्ये युजर्स आपल्या फॉलोअर्सना अतिरिक्त कंटेंट दाखवण्यासाठी पैसे घेऊ शकतात. यामध्ये बोनस ट्विट, कम्युनिटी ग्रुपपर्यंत पोहोचणे, न्यूजलेटरची सदस्यता आदींचा समावेश आहे.
ज्या युजर्सचे खूप फॉलोअर्स आहेत, ते सुपर फॉलो फिचरअंतर्गत युजर्स फॉलोअर्सकडून विशेष कंटेंट पाहण्यासाठी प्रत्येक महिन्यात ४.९९ डॉलर म्हणजेच ३६४ रुपये घेऊ शकतात. नव्या फिचर्समुळे आता ट्विटर यूट्यूब आणि इन्टस्टाग्रामच्या प्रकारात मोडलं जाणार आहे. यूट्यूबमध्ये डाउनलोडींग आणि स्पेशल कंटेंटसाठी सब्सक्रिप्शनची सुविधा आहे.
ट्विटरच्या या फिचरचा फायदा कंटेंट बनवणार्यांना होणार आहे. त्यांना यूट्यूबशिवाय कमवण्याचा नवा पर्याय मिळाला आहे. यामधील कमाईचा भाग ट्विटरसुद्धा घेणार आहे. ट्विटरची कमाईमध्ये किती हिस्सेदारी असेल, याबाबत त्यांच्याकडून कोणताही खुलासा झालेला नाही. सब्सक्रिप्शन फिचरमुळे ट्विटरच्या महसुलात वाढ होईल, असा विश्वास कंपनीला आहे.
सोबतच ट्विटरनं कम्युनिटी नावाच्या नव्या फिचरची घोषणा केली आहे. हे फिचर फेसबुक ग्रुपसारखंच आहे. लोक आपल्या आवडीनुसार ग्रुप बनवू शकतात आणि त्यात इतरांना सहभागी करून घेऊ शकतात. ट्विटर त्यांना त्यांच्या आवडीनुसार विषयांवरील ट्विट दाखवणार आहे. हे फिचर कधीपर्यंत लॉन्च केलं जाईल, याबाबत खुलासा झालेला नाही. विश्लेषक आणि गुंतवणूकदारांना केलेल्या प्रेझेंटेशनमध्ये ट्विटरनं या फिचर्सची माहिती दिली आहे.