नाशिक – भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरने जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसास चिरडले असल्याची घटना आज दुपारी घडली आहे. पेठ शहरापासून ४ किलोमीटर अअंतरावरील वांगणी गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे. राजू रोडलाइन्स ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रेलर (क्र. एमएच २३ एयू १४४१) पेठकडून वापीकडे जात होता.
या ट्रेलरने जिल्हा वाहतूक शाखेच्या वाहनाजवळ रस्त्यावर उभे असलेले पोलिस कर्मचारी कुमार गायकवाड यांना दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास धडक दिली. या जोरदार धडकेने गायकवाड हे घटनास्थळी काही क्षणातच गतप्राण झाले. यावेळी जिल्हा वाहतूक शाखेच्या (एमएच १५ एफ टी २४१९ः या वाहनात चालकासह ६ कर्मचारी होते. वाहतुक सुरक्षा सप्ताहानिमित्त वाहने अडवून तपासणी करण्यात येत आहे. त्याचवेळी भरधाव वाहनास अडविण्याच्या प्रयत्नात अपघात घडला. आणि पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने वरिष्ठ यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेवरुन सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.