नवी दिल्ली ः दिल्लीत २६ जानेवारीला ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारासंदर्भात याचिकांवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. एका याचिकेत घटनेच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायायाधीशांच्या अध्यक्षतेखाली आयोग बनवण्याची विनंती करण्यात आली आहे.
तीन कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करत २६ जानेवारीला हजारोंच्या संख्येत कृषी कायद्याच्या विरोधकांनी ट्रॅक्टर रॅली काढली होती. रॅलीदरम्यान दिल्लीच्या रस्त्यांवर हिंसाचार झाला होता. अनेक ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांनी रस्त्यात लावलेले बॅरिकेड्सचे अडथळे तोडले होते. वाहनांची मोडतोड करून लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडकवला होता. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती वी रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठासमोर याचिकांवर सुनावणी होईल.
वकील विशाल तिवारी यांनी दाखल केलेल्या याचिकेत हिंसाचाराच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय चौकशी आयोग गठित करण्याची विनंती करण्यात आली आहे. तिवारी आणि वकील मनोहर लाल शर्मा यांच्या याचिकांसह घटनेसंदर्भातील इतर काही याचिकांवर न्यायालयात सुनावणी होणार आहे.