वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची महाभियोगातून मुक्तता करण्यात आली आहे. ६ जानेवारीला कॅपिटल हिल इथं हिंसाचार भडकावण्याच्या आरोपातून डोनाल्ड ट्रंप यांना अमेरिकेच्या सिनेटनं मुक्त केलं आहे. महाभियोगच्या चार दिवस झालेल्या सुनावणीनंतर पाचव्या दिवशी मतदान झाले. त्यात ५७ सिनेटच्या सदस्यांनी ट्रम्प यांना दोषी मानलं. तर, ४३ सदस्यांनी त्यांना निर्दोष मानलं. १०० सदस्य असलेल्या सिनेटमध्ये ट्रम्प यांना दोषी ठरवण्यासाठी दोन तृतीयांश म्हणजेच ६७ मतांची गरज होती. परंतु त्यांना ती मिळू शकली नाहीत. दहा मतं कमी मिळाल्यानं त्यांना दोषमुक्त करण्यात आलं.
अमेरिकेच्या इतिहासात दोनदा महाभियोगचा सामना करणारे डोनाल्ड ट्रम्प पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत. एवढेच नाही. पदावरून पायउतार झाल्यानंतर महाभियोगला सामोरे जाणार्यांमध्येही ट्रम्प हे पहिलेच राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. बिल कॅसिडी, रिचर्ड बर्र, मिट रोमनी, सुसान कोलिन्स यांच्यासह सात रिपब्लिकच्या सदस्यांनी ट्रम्प विरुद्ध महाभियोग चालवण्याच्या बाजूनं मतदान केलं.
आरोपातून मुक्त झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी निवेदन जारी केलं. सर्वात प्रथम त्यांनी त्यांच्या लीगल टीमचे आभार मानले. अमेरिकेचा कोणताही राष्ट्राध्यक्ष या परिस्थितीतून गेला नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. सहा जानेवारीला कॅपिटल हिलमध्ये झालेल्या हिंसाचारात ५ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यात अनेक पोलिस जखमी झाले होते. आपल्या समर्थकांना उकसावल्यामुळे कॅपिटल हिलवर हल्ला झाला होता ज्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला, असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लावण्यात आला होता.
२०१९ मध्ये वाचली होती खुर्ची
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात १८ डिसेंबर २०१९ मध्ये सिनेटनं महाभियोग चालवला होता. परंतु रिपब्लिकन पार्टीचं नियंत्रण असलेल्या सिनेटनं फेब्रुवारी २०२० मध्ये त्यांना आरोपातून मुक्त केलं होतं. त्यादरम्यान जो बायडेन आणि त्यांच्या मुलाविरुद्धच्या कथित भ्रष्टाचाराच्या दाव्यांची चौकशी करावी, असा आरोप करत ट्रम्प यांनी यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांवर दबाव टाकल्याचा आरोप झाला होता.