वॉशिंग्टन – अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी संसदेवर हल्ला केल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली असून ट्रम्प यांच्यावर महाभियोगाचा खटला चालण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाकडून यासाठी विद्यमान उपराष्ट्रपती माइक पेंस आणि मंत्रिमंडळावर दबाव वाढवला आहे.
माइक पेंस यांनी महाभियोग खटला दाखल करण्याच्या दिशेने काही हालचाल केली नाही, तर डेमोक्रॅटिक नेते त्यासाठी योग्य पावले उचलतील असा इशारा देण्यात येत आहे. तथापि, ट्रम्प यांच्या कार्यकाळाला आता केवळ १२ दिवसांचा कालावधी शिल्लक आहेत. तसेच त्यांनी समर्थकांच्या या कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून दि.२० जानेवारी रोजी आपण शांततेत सत्ता हस्तांतरित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडेन यांना सत्ता देण्यास सहमती दर्शविली आहे. परंतु दि.२० जानेवारी रोजी नवीन राष्ट्रपती जो बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्याला ट्रम्प भाग घेणार नाहीत. तसेच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हिंसाचारच्या घटनेविषयी व महाभियोगच्या संभाव्य खटल्याबद्दल आपल्या समर्थक आणि कायदेशीर तज्ज्ञांशी सल्लामसलत करत आहेत.
जगातील सर्वात जुनी लोकशाही असलेल्या अमेरिकेत बुधवारी कॅपिटल या संसद संकुलात ट्रम्पच्या हजारो समर्थकांनी हल्ला केला. यामुळे ट्रम्प यांचा जगभरातून निषेध झाला. सुमारे चार तास चाललेल्या दंगलीत लोकशाहीला जणू काही ओलीस ठेवण्यात आले होते.यावेळी जोरदार तोडफोड व गोळीबार झाला. पोलिसांच्या कारवाईत पाच जण ठार आणि अनेक जखमी झाले. हिंसाचारनंतर चर्चेला उधाण आले असून डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदारांनी ट्रम्प यांना राष्ट्रपतीपदावरून काढून टाकण्याकरिता महाभियोगाची मागणी केली आहे.