वॉशिंग्टन – अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्यात कडक सुरक्षा व्यवस्था असणार आहे. कारण याच दरम्यान ट्रम्प यांच्यावर महाभियोग प्रस्ताव दाखल करण्यात आल्याने समर्थकांकडून कोणतीही गडबड किंवा गोंधळ होऊ नये, यासाठी सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
राजधानी इमारतीच्या सभोवताल कुंपण घालण्यासह सर्व कडक बंदोबस्ताची व्यवस्था केली गेली आहे. यावेळी हजारो नॅशनल गार्डचे जवान तैनात असतील. हा सोहळा राजधानी वॉशिंग्टनच्या वेस्ट फ्रंटमध्ये २० जानेवारीला होईल. लेडी गागा राष्ट्रगीत गातील, तर जेनिफर लोपेझ हे संगीत सादर करतील.
दरम्यान, अमेरिकेच्या संसदेवर हल्ल्याबाबत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरूद्ध बुधवारी महाभियोग प्रस्ताव पारित करण्यात आला. रिपब्लिकन पार्टीतील ट्रम्पचे समर्थक असलेल्या काही खासदारांनी त्यांची साथ सोडली आहे. दहा रिपब्लिकन खासदारांनीही या ठरावाच्या बाजूने मतदान केले. तो ठराव डेमोक्रॅटिक पक्षाच्या बहुमतासह संसदेचे कनिष्ठ सभागृहात मंजूर झाला. ट्रम्पवर संसदेवर हल्ला करण्यासाठी जमावाला भडकवण्याचा आरोप या प्रस्तावात करण्यात आला आहे. ६ जानेवारी रोजी कॅपिटल, संसद संकुलावर त्यांच्या समर्थकांनी हल्ला केला. महाभियोगमुळे ट्रम्प यांना अध्यक्षपदावरून हटविल्यास कोणतीही घटनात्मक पद सांभाळण्यासाठी त्यांना अपात्र ठरविण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.
आता पुढे काय होईल?
१- प्रतिनिधी सभागृहातून मंजूर केलेला ठराव संसदेचे वरिष्ठ सभागृह सिनेटला पाठविला जाईल.
२- यानंतर, १०० सदस्यांच्या सिनेटमधील बहुसंख्य नेते महाभियोगाची प्रक्रिया सुरू करतील.
३- शपथविधीच्या तयारीमुळे सिनेट अधिवेशन १९ जानेवारीपर्यंत होणार नाही.
४- ट्रम्प यांच्या कार्यकाळात सिनेटमध्ये महाभियोग येण्याची शक्यता कमी आहे.
५ – महाभियोग सिनेटमध्ये गेला तर तेथे दोन तृतीयांश बहुमत पार करावे लागेल.
६-रिपब्लिकन पक्षामध्ये ट्रम्प यांचा विरोधही वाढला असल्याचे यातून दिसून येते. तथापि, रिपब्लिकन कोणत्याही स्थितीत ट्रम्प यांच्याविरोधात मतदान करण्याची स्थिती सिनेटमध्ये स्पष्ट नाही.
७- यापुर्वी प्रतिनिधी सभागृहात ट्रम्पविरोधात पदाचा गैरवापर केल्याबद्दल डिसेंबर २०१९ मध्ये महाभियोग आणण्यात आला होता. पण नंतर हा महाभियोग रिपब्लिकन पक्षाच्या बहुसंख्य मतांमुळे सिनेटमध्ये अयशस्वीला. आता त्यांच्या कार्यकाळात फक्त सहा दिवस शिल्लक असताना केवळ एका वर्षात दुसर्या वेळी महाभियोग चालविला जात आहे.