टोसिलीझुमॅब इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी
नाशिक, मालेगांव महापालिका व नाशिक ग्रामीण या तीन भागात विभागणी- जिल्हाधिकारी
नाशिक – कोरोनाच्या संसर्गाचे रुग्णसंख्येमध्ये मोठया प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल होण्याचे प्रमाणात वाढ झालेली आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये टोसिलीझुमॅब इंजेक्शनची (Tocilizumab Injection) मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे टोसिलीझुमॅब इंजेक्शनचा जिल्ह्याला प्राप्त होणारा साठा सुयोग्य पात्र रुग्णांना वाटप होण्यासाठी नाशिक महानगरपालिका, मालेगांव महापालिका व नाशिक ग्रामीण या तीन भागात विभागणी करण्यात आली असल्याची माहिती, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी एका आदेशान्वये दिली आहे.
टोसिलीझुमॅब इंजेक्शनचा जिल्ह्यांतर्गत वितरण सक्रिय रूग्ण संख्येनुसार समन्यायी पद्धतीने होण्यासाठी यापुर्वी रेमडीसिवीर या औषधाच्या वितरणासाठी ठरविण्यात आलेली नाशिक महानगरपालिका, मालेगाव महानगरपालिका व नाशिक ग्रामीण अशा तीन भागांमध्ये करण्यात आलेली जिल्ह्याची विभागणी कायम ठेवण्यात आली आहे. आज 30 एप्रिल 2021 रोजी जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण संख्या नाशिक महानगरपालिका क्षेत्रात एकूण 23 हजार 444, नाशिक ग्रामीण क्षेत्रात 16 हजार 868 तर मालेगावात महानगरपालिक क्षेत्रात 1 हजार 707 असे एकूण 42 हजार 19 एवढी रुग्णसंख्या सक्रिय असून त्या भागानुसार टोसिलीझुमॅब इंजेक्शनचा वाटपाचे प्रमाण निश्चित करण्यात येणार आहे, तसेच जिल्ह्यात बाह्य रुग्ण ज्या कार्यक्षेत्रात उपचार घेत असतील त्या कार्यक्षेत्रातील कोट्यात समजण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी श्री.मांढरे यांनी आदेशात नमूद केले आहे.
टोसिलीझुमॅब इंजेक्शनचा तातडीने पुरवठा होण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती
टोसिलीझुमॅब इंजेक्शन या औषधाचे स्वरूप विचारात घेता हे औषध अत्यंत तातडीच्या उपचारासाठी आवश्यक आहे. संबंधित रुग्णांची वैद्यकीय स्थितीचा योग्य अभ्यास करून ते दिले जाणे अनिवार्य आहे. या इंजेक्शनच्या वितरणामध्ये कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी वेळ जाऊ नये व औषध रूग्णालयाला अतीतातडीने उपलब्ध होण्यासाठी तीन भागातील सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी, नाशिक, नाशिक ग्रामीण कार्यक्षेत्रासाठी जिल्हा शल्य चिकित्सक आणि मालेगांव महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी मालेगांव महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे, असेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आदेशात नमूद केले आहे.
वरील तिन्ही भागातून त्यांचेकडे प्राप्त होणारी मागणी तसेच रुग्णांच्या स्थितीचा विचार करून संबंधित सक्षम वैद्यकीय अधिकारी यांनी शासनाने याबाबत ठरवून दिलेल्या मापदंडाप्रमाणे संबंधित रुग्णालयांना या इंजेक्शनचे तातडीने वितरण करावे. टोसिलीझुमॅब इंजेक्शन वितरणाची कार्यपद्धतीबाबत त्यांचे कार्यक्षेत्रातील सर्व कोविड रुग्णालयांना त्यांनी अवगत करावे तसेच निश्चित केलेल्या ट्रिटमेंट प्रोटोकॉलनुसार रुग्णाला या औषधाची खरोखरी गरज असल्याबाबत पडताळणी होणे आवश्यक असल्याने ठरवून दिलेल्या नमुन्यात रुग्णालयांकडून येणारी मागणी नोंदवून घेण्यासाठी त्याच स्तरावर स्वीकृतीची योग्य ती व्यवस्था नेमून दिलेल्या सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तयार करण्याच्या सूचना, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सदर आदेशात केली आहे.
घटनाव्यवस्थापकाने वितरणावर संनियंत्रण ठेवावे
एखाद्या वेळी एका भागामध्ये टोसिलीझुमॅब इंजेक्शनची मागणी कमी असल्यास त्या भागातील शिल्लक असलेली इंजेक्शने जास्त मागणी असलेल्या भागांमध्ये उधारी तत्त्वावर घेण्याची मुभा संबंधित सक्षम अधिकारी यांना राहील त्यादृष्टीने त्यांनी आपसात समन्वय ठेवावा. वरीलप्रमाणे वाटप केलेल्या टोसिलीझुमॅब इंजक्शनचे वाटप व वापर सदर आदेशाप्रमाणे होत आहे किंवा कसे ‘ हे तपासणीसाठी पथके स्थापन करून रुग्णालयास झालेले वाटप व वापर तपासावे व त्रुटी आढळल्यास योग्य ती कार्यवाही करावी. तसेच घटना व्यवस्थापक तथा उपजिल्हाधिकारी निलेश श्रींगी यांनी टोसिलीझुमॅब इंजेक्शनचा वितरणावर संनियंत्रण ठेवावे तसेच वितरीत केलेल्या आदेशाची प्रत केंद्रीय कक्षाकडे सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आदेशात केली आहे.
29 एप्रिल रोजी जिल्ह्यात एकूण 43 टोसिलीझुमॅब इंजेक्शनचे वाटप
नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 55 टक्के सक्रिय रुग्णांचे प्रमाण असून एकूण 23 टोसिलीझुमॅब इंजेक्शनचे वाटप करायचे होते. त्यामध्ये विजय फार्मा 05, कुणाल एजन्सी 03, मे. चौधरी आणि कंपनी 05, हॉस्पी केअर एजन्सी 10 असे एकूण 23 टोसिलीझुमॅब इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला. नाशिक ग्रामीण क्षेत्रात एकूण 40 टक्के सक्रिय रुग्णांचे प्रमाण असून एकूण 18 टोसिलीझुमॅब इंजेक्शनचे वाटप करावयाचे होते त्यामध्ये महावीर फार्मा 02, सह्याद्री डिस्ट्रीब्युटर्स 02, रुद्राक्ष फार्मा 05, पुनम एन्टरप्रायझेस 05, स्वामी समर्थ एन्टरप्रायझेस 04 असे एकूण 18 टोसिलीझुमॅब इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला आहे. मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात 5 टक्के सक्रिय रुग्णांचे प्रमाण असून एकूण 02 टोसिलीझुमॅब इंजेक्शनचे वाटप करायचे होते. त्यामध्ये ब्रह्यगिरी एन्टरप्रायजेसने 02 टोसिलीझुमॅब इंजेक्शनचा पुरवठा केला असून जिल्ह्यात एकूण 20 टोसिलीझुमॅब इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.