नाशिक – शहरातून जाणाऱ्या मंबई-आग्रा महामार्गावर उड्डाणपुलाखालून वाहनधारकांना सध्या जीव मुठीत घालूनच वाहतूक करावी लागत आहे. उड्डाणपुलावरुन पावसाचे पाणी थेट रस्त्यावर आणि वाहनचालकांवरच पडत आहे. अक्षरशः धबधब्यासारखे कोसळणाऱ्या या पाण्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. यामुळे दुचाकी वाहने घसरण्याची मोठी भीती आहे. काही प्रमाणात अपघातही घडत असून सर्व वाहनचालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
आडगाव नाका ते लेखानगर पर्यंत सर्व ठिकाणी उड्डाणपुलाखाली पाणी गळत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई नाका, द्वारका, पंचवटी कॉलेज याठिकाणी हे प्रमाण सर्वाधिक आहे. टोल वसूल करतात मग पावसाचे पाणी उड्डाणपुलावरुन रस्त्यावर कसे पडते, असा सवाल वाहनचालक करीत आहेत. रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीने उड्डाणपुलावर पावसाच्या पाण्यासाठी केलेली पाईपलाईन ठिकठिकाणी फुटली आहे. त्यातून मोठी गळती होत असून हे पाणी रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनचालकांवरच पडत आहे.
बघा व्हिडिओ