नवी दिल्ली ः रस्त्यांवरील वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्याची मोठी डोकेदुखी वाहनधारकांसमोर असते. मार्ग काढताना वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यातही टोल नाक्यांवर वाहनांच्या लांब रांगा असतात. त्या टाळण्यासाठी केंद्र सरकार आता नवा मार्ग काढत आहे. त्यासाठी नव्या धोरणावर काम सुरू आहे. या धोरणामुळे वाहतूक अधिक वेगवान होण्याची शक्यता आहे.
काय आहे योजना
या नव्या धोरणानुसार, राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यास टोल भरावा लागणार नाही. टोल नाक्यावरील प्रत्येक लेनमध्ये वेगळ्या रंगाची रेष असेल.
कोंडी झाल्यास वाहनांची रांग त्या रेषेच्या पुढे गेल्यास टोल ऑपरेटरला गेट उघडावे लागेल. त्यानंतर त्या लेनमधील वाहनं टोल न भरता जाऊ शकतील, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. केंद्र सरकार सध्या या धोरणावर काम करत आहे.
रिअल टाईम मॉनिटरिंग
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी फास्टॅग प्रणाली अमलात आणण्यात आली. फास्टॅगचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. परंतु तरीही वाहतूक कोंडी कायम असल्याचा अहवाल केंद्र सरकारला मिळाला आहे. त्यामुळे सर्व टोल नाक्यांवरील रिअल टाईम मॉनिटरिंग सुरू करण्यात आली आहे.
अनेक दिवसांपासून अधिकारी टोल नाक्यांवरील व्यवस्थेचं विश्लेषण करत आहे. फास्टॅगच्या माध्यमातून व्यवहार ९० टक्क्यांवर गेले आहेत. ग्रामीण भागातही फास्टॅगचा वापर वाढला आहे. त्यामुळे टोल नाक्यांवरील कोंडीबाबत कोणतंही ठोस कारण देता येत नाही, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. टोल नाक्यांवरील वाहतूक आणि लेन्सची संख्या यावर रेष आखण्यात येईल, असंही अधिकार्यानं स्पष्ट केलं.