येवला – तालुक्यात टोमॅटो पिकावर करपा रोग पडल्याने उत्पादनाच्या उंबरठ्यावर असलेले हजारो हेक्टरवरील टोमॅटो पिक संकटात सापडले आहे. तालुका परिसरात यंदा शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागवड केली आहे. ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून तालुक्यातील टोमॅटोची राज्यात व राज्याबाहेर विक्री सुरू होते. परंतु, गेल्या पंधरा-वीस दिवसापासून श्रावणसरींसह जोरदार पाऊस व याबरोबरच उष्ण-दमट वातावरण यामुळे टोमॅटो पिक करपा रोगाला बळी पडले आहे. करपामुळे टोमॅटो पिकाच्या पाने, फांद्या व फळांवर काळे ठिपके पडल्याने पिक वाया जात आहे. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.