नाशिक – सांधेदुखीवर उपचारार्थ असलेले टेसिलिझ्युमॅब हे इंजेक्शन सरसकट कोरोनाच्या रुग्णांसाठी वापरुन अनावश्यकरित्या मागणीचा फुगवटा निर्माण केला जात असल्याचे चित्र आहे. हे इंजेक्शन सरसकट देऊ नये, असे परिपत्रक आरोग्य संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी काढले असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. डॉक्टरांकडून या इंजेक्शनचा तगादा लावला जात असल्याने बाजारात या इंजेक्शनसाठी कितीही पैसे मोजण्यासाठी रुग्णाचे नातेवाईक तयार होत आहेत. हे इंजेक्शन परदेशातून आयात केले जाते. सध्या मागणी प्रचंड आहे आणि पुरवठा अत्यल्प. त्यामुळे कोरोना बाधितांचे कुटुंबिय प्रचंड वैतागले आहेत. अनावश्यकरित्या इंजेक्शनचा तगादा लावून डॉक्टर नक्की काय साध्य करीत आहेत, असा सवाल रुग्णांचे नातेवाईक आणि केमिस्ट यांच्याकडून विचारला जात आहे. जे इंजेक्शन मिळत नाही त्याची प्रचंड मागणी निर्माण करण्यात काहीच साध्य होत नसल्याचे मेडिकल दुकानदारांचे म्हणणे आहे.
दरम्यान, बोईसर येथे टेसिलिझ्युमॅब या इंजेक्शनचा तगादा लावणाऱ्या डॉक्टरवर निलंबनाची कारवाई झाली आहे. मात्र, खासगी डॉक्टरांकडून सरसकट हे इंजेक्शन प्रिस्क्रीप्शनमध्ये लिहीले जात असल्याने मोठाच गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र आहे.
—
टेसिलिझ्युमॅब हे इंजेक्शन सरसकट वापरु नये, असे राज्य सरकारने म्हटले आहे. खरोखरच त्याचा तुटवडा आहे. त्यामुळे अनावश्यक मागणी निर्माण करुन काय साध्य केले जात आहे. या प्रकारात केमिस्ट मात्र बदनाम होत आहेत. हे थांबायला हवे.
- गोरख चौधरी, अध्यक्ष, नाशिक जिल्हा केमिस्ट असो
—
टेसिलिझ्युमॅब हे इंजेक्शन कोरोनाच्या उपचारावर नाही. ते सांधेदुखीवर वापरले जाते. विनाकारण त्याची मागणी नोंदवून काहीच साध्य होणार नाही. या इंजेक्शनचे अनेक साईडइफेक्ट्स आहेत. डॉक्टरांनी त्याची दखल घ्यावी
- माधुरी पवार, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन
राज्याच्या वैद्यकीय संचालनालयाने काढलेले पत्रक सर्वांच्या माहितीसाठी