नवी दिल्ली ः स्वीडन इथली पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिच्या वादग्रस्त ट्विटप्रकरणी पोलिसांच्या सायबर सेलनं गूगलला टूलकिट कोणत्या देशात, शहरात तयार करण्यात आलं, कोणाच्या आयपी अॅड्रेसवर तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलं, अशी माहिती ई – मेल करून मागवली होती. त्यावर सायबर सेलला आयपी अॅड्रेससह बरीच महत्त्वाची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेली हवामान बदलावर काम करणारी दिशा रवी हिच्या जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान पटिलाया हाऊस न्यायालयात ही माहिती देण्यात आली.
पोलिसांनी सुनावणी दरम्यान सांगितलं की, दिशानं इंटरनॅशनल फार्मर स्ट्राइक नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप बनवला होता. त्यामध्ये अनेक बाबींवर चॅटिंग करण्यात आली होती, जी पकडल्या जाण्याच्या भीतीनं डिलिट करण्यात आली होती. खालीस्तानी मुद्याला पुनर्जीवित करण्यासाठी आरोपींनी आस्क इंडिया व्हाय (भारताला विचारा, का) नावाचे संकेतस्थळ तयार केलं होतं. या माध्यमातून खालीस्तानी संघटना भारतात आपला प्रचार करू इच्छित होत्या. त्यामुळे आस्क इंडिया व्हाय नावावरून हॅशटॅगसुद्धा सुरू करण्यात आलं होतं. कॅनडातल्या पोएटिक जस्टिक फाउंडेशनचा प्रमुख एम ओ धालीवाल याचा कृषी कायद्याविरोधातल्या आंदोलनाच्या आडून देशातलं वातावरण बिघडवण्याचा हेतू होता. यात थेट काही करण्याऐवजी त्यानं काही चेह-यांचा आसरा घेतला. त्यामध्ये दिशा रवी, निकिता जेकब, शंतनू मुलूक यांच्यासारख्या काही जणांचा समावेश आहे.
लोकांना भ्रमित करण्यासाठी दिशा रवीनं शेतक-यासंदर्भात एक ग्रुप बनवला होता. धालीवाल, अनिता लाल आणि देशाबाहेर असणा-या इतर लोकांनी देशाविरुद्ध मोठं षडयंत्र रचलं होतं. त्याअंतर्गत ११ जानेवारीला झूम अॅपवर या लोकांची ऑनलाइन मीटिंग झाली होती. हा ग्रुप वेगळ्या खालीस्तानची मागणी करत आहे. सिख फॉर जस्टिस या प्रतिबंधित संघटनेनं २६ जानेवारीला इंडिया गेटवर झेंडा फडकवणा-याला बक्षिसाची घोषणा केली होती.
टूलकिटमध्ये काहीही चुकीचं नव्हतं तर हे लोक का घाबरले होते, घाबरून त्यांनी अनेक गोष्टी का डिलिट केल्या, शेतक-याच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान सोशल मीडियावर भूमिका का बनवण्यात आली, असे प्रश्नही पोलिसांनी उपस्थित केले.