नवी दिल्ली – दोन दिवसांपूर्वीपासूनच अचानकच टूलकिट हा शब्द ऐकू येऊ लागला. पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांच्या एका टि्वटनंतर हा शब्द जास्त प्रचलित झाला. त्यामुळेच सर्वांना हे जाणून घेण्यात खूप इंटरेस्ट आहे. खासकरून सोशल मीडियावर ज्या व्यक्ती सक्रिय असतात, त्यांनाही याची उत्सुकता आहे.
काय असते टूलकिट?
टूलकिट म्हणजे एखाद्या विषयाची सर्वंकष माहिती. तुम्हाला एखादी चळवळ उभारायची असेल तर त्यासाठी आवश्यक सर्व मुद्दे आणि तुम्ही कशा पद्धतीने ही चळवळ राबवावी, यासंबंधीचे सगळे मुद्दे तुम्हाला येेथे मिळतात. साधारणपणे कोणत्याही मोठ्या आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना कार्यकर्त्यांंना या माध्यमातून सूचना, रणनीती सांगितली जाते. अमेरिकेत सर्वप्रथम याचा वापर करण्यात आला होता.
प्रभावी अस्त्र
थोडक्यात, एखाद्या आंदोलनासाठी तुम्हाला सोशल मीडियावर हवा करायची असेल तर तसेच आंदोलनासाठी पाठबळ हवे असेल तर त्यासाठी हे एक प्रभावी डीजिटल अस्त्र आहे. आंदोलनासाठी ज्या गोष्टी लागतात, त्या सर्वांचा समावेश या टूलकिटमध्ये असतो. जेणेकरून आंदोलन अधिक व्यापक होईल.
हॅशटॅग
सध्या या शब्दावरून जी चर्चा सुरू आहे, त्यासाठी ग्रेटा थनबर्ग हिचे टि्वट कारणीभूत आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ तिने एक टि्वट केले. त्यात तिने टूलकिट नावाचे एक डॉक्युमेंट शेअर केले आहे. ते पाहून सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. गोंधळ उडाल्यानंतर ग्रेटाने हे टि्वट डीलिट केले. आणि दुसरे टि्वट करत दुसरे टूलकिट शेअर केले. यात या आंदोलनाची संपूर्ण माहिती होती. तसेच त्यासंबंधी माहिती सोशल मीडियावर टाकायची असेल तर त्यासाठी कोणते हॅशटॅग वापरणे आवश्यक आहे, काही अडचण असल्यास कोणाशी बोलायला हवे, टि्वट करताना ते कसे करावे, याची माहिती देण्यात आली आहे.