नाशिक – मालेगाव तालुक्यातील झोडगे येथील पूजा देसाई हिने ८ तासात निरनिराळ्या पद्धतीचा मेकअप करून सौंदर्यप्रसाधनांचा अनोखा विक्रम नोंदविला आहे. म्हणूनच तिची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स २०२१ मध्ये झाली आहे. आठ तासांच्या अवधीत तिने ५५ वेगवेगळ्या मुलींच्या चेहऱ्यावर मेकअप केला आहे. याआधी सौंदर्यप्रसाधन क्षेत्रात आठ तासांत ३२ मुलींच्या चेहऱ्यावर मेकअप करण्याचा विश्वविक्रम नोंदवण्यात आला होता. मेकअप क्षेत्रात वयाच्या २० व्या वर्षी आपले नाव विश्व रेकॉर्ड मध्ये नोंदवलेली पूजा एकमेव आहे.
झोडगे गावातील प्रगतीशील शेतकरी यशवंत देसाई यांची ती कन्या आहे. ती सध्या झोडगे येथील संदीप कला महाविद्यालयात एसवाय बीएचे शिक्षण घेत आहे. सौंदर्य क्षेत्रात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स करून आंतरराष्ट्रीय स्तरावर झोडगे गावाची नवी ओळख निर्माण केली आहे. ३२ मुलींचा मेकअप करण्याचा विक्रम तिने मोडला आहे. समितीकडून अधिकृत प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह तिला मिळाले आहे. तिच्या या यशात आई उज्ज्वला हिचा मोलाचा वाटा आहे. तिने हा रेकॉर्ड सप्टेंबर २०१९ मध्ये केला होता. ‘द मोस्ट कॉस्मेटिक्स मेकओव्हर्स कम्प्लिट इन ८ अवर्स बाय (इंडिव्हिज्युअल)’ हे प्रमाणपत्र व मेडल तिला आता प्राप्त झाले आहे.