इगतपुरी – तालुक्यातील टाकेद खुर्द, अधरवड, टाकेद बुद्रुक येथील आदिवासी कातकरी समाज भटकंती करून गुजराण करतो. या समाजासाठी पिण्याचे पाणी, शौचालय बांधकाम यासह इतर मागण्या पूर्णत्वाकडे आहेत. या योजनांना खेड जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांच्या प्रयत्नांनी नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे रोजगारासाठी वीट भट्टी, खडी फोडणे, वनपट्टे आदींतून जगणाऱ्या आदिवासी कातकरी समाजाला विकासाची वाट सापडली आहे.
कातकरी समाज इतर आदिवासी समाजांपेक्षा खूपच मागे असून आपल्या पारंपरिक चालीरीती रूढी परंपरा सांभाळतो. विकासात मागे राहिल्यामुळे आदिवासी प्रवर्गात आदिम म्हणून कातकरी ओळखले जातात. कायमच रोजगारासाठी स्थलांतर सुरू असल्यामुळे कातकरी बांधव शासनाच्या योजनांपासून वंचित आहेत. सर्वेक्षण यादीत नाव राहून जात असल्याने शासकीय योजनांतून शौचालयासाठी अनुदान मिळत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा कातकरी समाजाला अनेकदा दोन दोन किलोमीटर भटकावे लागते. यामुळे कुपोषण, आजारपण, अल्प आयुष्य आदींचा सामना कातकरी करतात.
या पार्श्वभूमीवर कातकरी बांधवांनी टाकेद खुर्द येथे खेड गटाचे जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांच्याकडे समस्या मांडल्या. शौचालय बांधकाम आणि पिण्याचे पाणी ह्या प्रमुख समस्या सोडवण्यासाठी लोहकरे यांनी तात्काळ दखल घेतली. टाकेद खुर्दसह अधरवड, टाकेद बुद्रुक येथील कातकरी वस्त्यांचे नाविन्यपूर्ण योजनेत प्रस्ताव तयार करण्यात आले. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निरंतर पाठपुरावा केला. शौचालयाची आवश्यकता, कातकरी बांधव योजनेपासून वंचित असण्याची कारणे, आर्थिक परिस्थिती आदींमुळे शौचालय बांधू शकत नसल्याचे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पटवून दिले. त्यानुसार प्रशासनाने दखल घेऊन नाविन्यपूर्ण योजनेतून कातकरी बांधवांसाठी कामांना तात्काळ मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे कातकरी बांधवांची शौचालय बांधकाम समस्या सुटणार असून प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे. टाकेद खुर्द, टाकेद बुद्रुक येथे सद्यस्थितीत नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर असून अधरवड येथे योजना कार्यान्वित आहे. पाणीपुरवठा विभागाने संबंधित अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासनास सूचना देऊन कातकरी वस्तीसाठी स्वतंत्र पाईपलाईनद्वारे पाणी देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कातकरी बांधवांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शौचालय बांधकाम या प्रमुख समस्या सुटणार आहेत. कातकरी बांधवांसह टाकेद बुद्रुक, अधरवड, टाकेद खुर्दचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आदींनी कातकरी वस्त्यांमधील प्रश्नांची सोडवणूक झाल्याबद्दल हरिदास लोहकरे यांच्याकडे समाधान व्यक्त केले आहे.
आमचं काम भाऊंनी केल
आमच्य घरांमंधी संडासाची कामा व्हयेल नव्हती. इढ करील तवा खाऊ अशी गत हाये, तवा संडासा कशी बांधायची ? पयल्यावानी मोकळ्या रानात झाड्याला जाया लाज वाटतेय, दोन रुपये किलुने धान्य मिळतं पण यादीत नाव नसला त संडास बांदाया पैस देत नय आन त्या पैश्यात गरिबाचा संडास बांधूनय व्हत नय. माणसानची लय आबाळ व्हयाची. लय भारी काम झाला तकतकच नय रायली, झेडपी मेंबर हरिदास भाऊला आम्या समद्यानी सांगितला तवा त्यानीच आमचं काम केलं.
– झुंबर मुकणे, लाभार्थी कातकरी टाकेद खुर्द
आमचे प्रश्न सुटणार आहे
कातकरी कुटुंब शासकीय योजनेत नावे नसल्याने कातकरी बांधव शौचालय योजनेपासून वर्षानुवर्षे वंचित होती. अनेकदा कातकरी वस्ती भेटीत शौचालयाचा विषय चर्चेत आल्याने त्यासाठी जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांनी पाठपुरावा केला. त्यात यश मिळाले. कातकरी बांधवांची शौचालयासह पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार आहे. आम्ही हरिदास लोहकरे यांचे आभार मानतो
– बहिरू लगड, ग्रा.पं. सदस्य टाकेद खुर्द