नाशिक रोड – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदगिरी येथे शाळेचे मुख्याध्यापक दत्तू कारवाळ निर्मित ज्ञानभिंत शैक्षणिक प्रकल्पाचे उद्घाटन नाशिक पंचायत समितीच्या सदस्या उज्ज्वला जाधव यांच्या शुभहस्ते झाले.
यावेळी नाशिक डायटचे अधिव्याख्याता योगेश सोनवणे, पं.स.गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब ठाकरे, शिक्षणविस्ताराधिकारी प्रकाश वैष्णव, भाऊसाहेब जगताप, विषयतज्ञ यशवंत शिंदे, केंद्र प्रमुख संग्राम शिरसाट, माजी सरपंच शोभा कटाळे, रमेश कटाळे, अशोक कटाळे, पोलीस पाटील लखण कटाळे, किरण कटाळे, सामाजिक कार्यकर्ते बागूल, शिवाजी वांजुळ, बलसागर कटाळे, धनाजी कटाळे, राम कटाळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश हांडगे, इंदिरा नागरे आदि उपस्थित होते.
नाशिक तालुका पूर्व भागातील चांदगिरी येथील जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशिल शिक्षक दत्तू कारवाळ यांनी आपल्या संशोधक वृत्तीतून पहिली ते सातवीच्या अप्रगत विद्यार्थ्यांसाठी तसेच प्रौढ साक्षरांसाठी ‘ज्ञानभिंत’ या शैक्षणिक उपक्रमाची शाळेतील रिकाम्या भिंतींचा अभिनव वापर करुन निर्मिती केली.त्यासाठी शाळेतील वर्गाच्या मुख्य फळ्याच्या खालील व वरील भागातील रिकाम्या जागेचा शैक्षणिक नवनिर्मितीकामी सुंदर उपयोग करुन घेण्यात आले. त्यामुळे वर्गातच शैक्षणिक वातावरणाची निर्मिती होऊन विद्यार्थी खेळात रमातात.
‘ज्ञानभिंत’ उपक्रमात भिन्न स्वरुपाच्या शैक्षणिक साधनांचा समावेश होतो. त्यामध्ये गणित संबोधपट्टी अंतर्गत इलेक्ट्रॉनिक पट्टी व पट्टा फळा अंतर्गत दृष्टीकरण, दृढीकरण व संबोधन पट्टा फळा यांचा उल्लेख करता येतो. ही शैक्षणिक साधने शाळेतील वर्गाच्या भिंतीवरच साकारलेले असल्याने भिंतींनीच आता विद्यार्थ्यांना शिकवण्याचा वसा घेतला आहे असेच म्हणावे लागेल. म्हणुनच शालेय विद्यार्थ्यांसह प्रौढ साक्षरांनाही ज्ञानदान करणाऱ्या या उपक्रमास ‘ज्ञानभिंत शैक्षणिक नवसंशोधन उपक्रम’ अशी मार्मिक उपमा दिली आहे.
पाया पक्का असला तरच इमारत मजबूत होते. इयत्ता पहिली, दुसरी हे शालेय जीवनाचा पायाच असतात. अशावेळी मुलांची अभ्यासाची आवड टिकून राहावी, मुलांनी मोबाईल, टिव्हीच्या अती आहारी जाण्यापासून मुक्त व्हावे, शिकविलेला अभ्यास त्यांच्या स्मरणपटलावर कोरला जावा या तळमळीपोटी ‘ज्ञानभिंत’ या उपक्रमाची निर्मिती करण्यात आली.
या उपक्रमाची उपयुक्तता व फायदे
आनंददायी शिक्षणासाठी हातभार लावून अध्ययन व अद्यापन प्रक्रिया रंजक बनली आहे.विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययन पध्दतीने ज्ञान मिळविण्यासाठी अत्यंत प्रभावशाली साधन ठरणार आहे. गणितातील मुलभूत संबोध विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे कठीण काम असते तेच काम ज्ञानभिंत उपक्रमाद्वारे आनंददायी व सुलभ होतात. राष्ट्रिय साक्षरता प्रसारासाठी हा उपयुक्त उपक्रम आहे. मराठी, इंग्रजी विषयाच्या शुध्द लेखनासाठी, सुंदर, आकर्षक, वळणदार हस्ताक्षर व वाचनासाठी उपयोग होणार आहे.
अभिनव कल्पना साकारली
पहिली व दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात समाविष्ट गणित प्रक्रियांच्या वाचन, लेखन व गणिती संबोध स्वतःच समजाऊन घेण्याची अभिनव कल्पना साकारलेली आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांना कमीत कमी वेळेत ज्ञानाची देवाण घेवाण करणे साध्य झाले आहे. विद्यार्थी व प्रौढ साक्षरांना पाटी, पेन्सील, दप्तराविना शिक्षण घेण्याची सुविधा निर्माण झाल्याने पालकांच्या व शासनाच्या खर्चात बचत होते.
पाठीवरील दप्तराचे ओझे होते हलके
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे हलके होते. दिवसेंदिवस शाळेत व घरीही अद्यापनात आधुनिक इलेक्ट्रॉनिक, डिजिटल साधने जसे मोबाईल, टिव्ही., संगणकाच्या अती वापरामुळे अभ्यासाची गोडी कमी होत चालली आहे, अशावेळी विद्यार्थी अर्धातासही एका ठिकाणी बसून शांत चित्ताने अभ्यास करु शकत नाही हे वास्तव आहे. यासाठी ‘ज्ञानभिंत’ उपक्रम प्रभावी ठरु शकतो.
‘ज्ञानभिंत’ प्रकल्पाचा खर्च शिक्षकानेच केला
या उपक्रमाच्या निर्मितीसाठी झालेला खर्च रुपये पन्नास हजार स्वतः शिक्षक दत्तू कारवाळ यांनी केला आहे. या उपक्रमशिल शिक्षकांना ज्ञानभिंतीच्या निर्मिती कामी डायट नाशिकचे जेष्ठ अधिव्याख्याता योगेश सोनवणे, तालुका गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब ठाकरे,भाऊसाहेब जगताप, शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश वैष्णव, केंद्र प्रमुख वाल्मिक हिंगे, विषय तज्ञ यशवंत रायसिंग, शिक्षिका इंदिरा नागरे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.
उपक्रमाचे कौतुक
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश हांडगे, उपाध्यक्ष जयराम वांजूळ, माजी सरपंच शोभा कटाळे, सदस्य किरण कटाळे, सामाजिक कार्यकर्ते रमेश कटाळे, संतोष कटाळे, नंदू कटाळे, विजय बागूल, सोमनाथ बागूल, पोलीस पाटील लखण कटाळे आदि सहकार्य लाभले. भगूर बीटाचे शिक्षणविस्ताराधिकारी प्रकाश वैष्णव यांनी ज्ञानभिंतीच्या डिझिटल निर्मिती कामी मदत केली. तर गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब ठाकरे यांनी ज्ञानभिंतीच्या निर्मातीबद्दल दत्तू कारवाळ व इंदिरा नागरे यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे माजी राज्याध्यक्ष काळुजी बोरसे पाटील, कोषाध्यक्ष केदुजी देशमाने, राज्य संघटक सुनिल भामरे, जिल्हाध्यक्ष आनंदा कांदळकर, जिल्हा सरचिटणीस प्रकाश सोनवणे यांनी भेट देऊन, पाहणी करुन या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले.