नाशिक – नाशिक जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक या पतसंस्थेची सभासद कर्ज मर्यादा चार लक्ष होती. पतसंस्थेच्या सभासद यांनी केलेल्या विनंतीनुसार १५ ऑगष्टपासून सभासदांच्या कर्ज मर्यादेत वाढ करुन ही कर्ज मर्यादा रुपये चार लक्ष वरुन रुपये पाच लक्ष करण्याच्या विषयास नाशिक जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाने मासिक सभेत एकमताने मान्यता दिली. आरोग्य कर्मचारी पतसंस्थेचे सभासद असलेल्या आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी कुटुंब संरक्षण विमा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यानुसार आरोग्य कर्मचारी पतसंस्थेचे सभासद असलेल्या व विहित अटी व शर्थी पूर्ण करणाऱ्या माहे ३१ मार्च २०२० अगोदर निधन झालेल्या सभासद वारसास रुपये एक लक्ष विमा मदत तर १ एप्रिल २०२० नंतर मयत झालेल्या सभासद वारसास रुपये दोन लक्ष विमा मदत पतसंस्थेतर्फे दिली जात आहे. त्यानुसार सिन्नर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ठाणगांव येथे कार्यरत असतांना मयत झालेले आरोग्य सेवक स्व. पुंजाराम लोहकने यांचे वारसास रुपये एक लक्ष तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, आंबोली येथे कार्यरत असतांना मयत झालेले आरोग्य सहाय्यक स्व. सुनील पगारे यांचे वारसास रुपये दोन लक्ष विमा मदत मासिक सभेत मंजुर करण्यात आली. सदर मदतीचे वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष विजय देवरे यांनी दिली.
जिल्ह्यात ग्रामीण भागातील सभासद असलेल्या आरोग्य कर्मचारी यांचेसाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात फोन पे स्टिकर लावण्यात आले आहे. फोन पे सुविधेद्वारे पतसंस्थेचा कर्ज हप्ता तथा सभासद वर्गणी पतसंस्थेच्या बँक खात्यावर सहज भरता येणार आहे. यामुळे कर्जदार सभासदास फोन पे सुविधेद्वारे तात्काळ आपल्या कर्तव्य मुख्यालयी राहून सुद्धा आपल्या मोबाईलद्वारे कर्ज हप्ता भरणे सुलभ होणार आहे. नाशिक जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी पतसंस्थेची स्थापना ६ मे २०१६ रोजी करण्यात आलेली होती. जिल्हा परिषद स्तरावर ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचारी बंधू भगिनी यांना आर्थिक निकड पूर्ण करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होण्यासाठी आरोग्य कर्मचारी यांनी या पतसंस्थेची स्थापना केली आहे. सद्यस्थितीत पतसंस्थेचे ७२९ सभासद असुन खेळते भाग भांडवल रुपये तीन कोटी पर्यंत झाले आहे. पतसंस्थेचे मासिक वर्गणी व कर्ज हप्ता हा संगणकीय ऑनलाइन प्रणालीद्वारे पतसंस्थेस जमा केले जात असून, कर्ज वितरण नेट बैंकिंग प्रणालीद्वारे कर्जदार सभासदाच्या बँक खात्यावर जमा केले जात आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचारी पतसंस्थेच्या सभासदास कर्ज मागणी केल्यास, तात्काळ कर्ज उपलब्ध होत आहे. आरोग्य कर्मचारी पतसंस्थेने थोड्याच अवधित कर्ज मर्यादा रुपये चार लक्ष वरुन रुपये पाच लक्ष मर्यादेपर्यंत नेली, त्याबद्दल नाशिक जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था संचालक मंडळ व सभासद यांनी आनंद व्यक्त केला आहे.
पतसंस्थेच्या संचालक मंडळाने सभासद मासिक वर्गणी व कर्ज वसुली बाबत वेळेत पतसंस्थेस भरना करनेबाबात केलेल्या पाठपुराव्यामुळे पतसंस्था कर्ज मर्यादेत वाढ करु शकत असल्याचे प्रतिपादन नाशिक जिल्हा आरोग्य कर्मचारी पतसंस्था मर्यादित नाशिकचे संस्थापक अध्यक्ष जी.पी. खैरनार यांनी केले आहे. नाशिक जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्थेची मासिक सभा संस्थेचे अध्यक्ष विजय देवरे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. पतसंस्थेच्या मासिक सभेस पतसंस्थेचे उपाध्यक्ष जयवंत सोनवणे, सचिव श्रीमती सोनाली तुसे, संस्थापक चेअरमन तथा संचालक जी.पी.खैरनार, संचालक एफ. टी.खान, मधुकर आढाव, विजय सोपे, प्रशांत रोकडे, संजय पगार, श्रीकांत अहीरे, गोरक्षनाथ लोहकरे, सुनिल जगताप, तुषार पगारे, जयवंत सूर्यवंशी, श्रीमती सुलोचना भामरे व व्यवस्थापक रामदास वडनेरे उपस्थित होते.