मुंबई :ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई भावे यांचे शुक्रवारी रात्री १२ .३० वाजता मुंबई येथे वृद्धापकाळाने निधन झाले. सुस्पष्ट वैचारिक भूमिका, लोकशाही आणि समतेच्या मूल्यांचा वसा, प्रभावी वक्तृत्व आणि त्याला सुसंगत प्रत्यक्ष कृतीची जोड ही ज्येष्ठ समाजवादी नेत्या, विचारवंत आणि लेखिका प्रा. पुष्पा भावे यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्टय़े होते. विद्यार्थिदशेपासून राष्ट्र सेवा दल आणि लोकशाहीवादी चळवळींशी पुष्पाताईंचा संपर्क होता.
मराठीच्या प्राध्यापक आणि विद्यार्थिप्रिय शिक्षक या नात्याने अध्यापन क्षेत्रात कार्यरत असताना केवळ हस्तिदंती मनोऱ्यात राहण्याऐवजी क्रियाशील स्वभावामुळे त्या सातत्याने समाजाशी जोडल्या गेल्या होत्या. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन अशा सत्याग्रहांमध्ये भाग घेत त्यांनी ही नाळ यशस्वीपणे सांभाळली. म्हणूनच स्वातंत्र्योत्तर काळात महागाईविरोधी आंदोलनामध्ये अहिल्याताई रांगणेकर आणि मृणाल गोरे यांच्यासमवेत पुष्पाताई या लाटणे मोर्चात हिरिरीने सहभागी झाल्या होत्या. मुंबईतील गिरणी कामगार संघर्ष समितीच्या चळवळीला वैचारिक मार्गदर्शन करण्यापासून कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी सरकारशी संघर्ष करण्यात पुष्पाताई अग्रभागी होत्या. स्त्रीवादी चळवळीची पाठराखण करणाऱ्या पुष्पाताईंनी दलित स्त्रियांच्या संघटनेमध्ये स्वतंत्र वैचारिक भूमिका घेत संघटन केले. डॉ. बाबा आढाव यांच्या असंघटित कामगार चळवळीत हमाल, रिक्षावाले, कागद-काच-पत्रा वेचणारे अशा कष्टकऱ्यांच्या आंदोलनांमध्ये त्या समर्थक राहिल्या.