औरंगाबाद – राज्यातील ज्येष्ठ नेते व औरंगाबादचे माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांचे निधन झाले आहे. ते एक अतिशय लोकप्रिय व समाजाच्या सर्वच घटकांमध्ये स्वीकारार्हता असलेले ते नेते होते. सरपंच पदापासून आमदार व खासदारकीपर्यंतच्या प्रवासातून त्यांची कर्तबगारी व लोकप्रियता होती. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात त्यांच्याच रूपात काँग्रेसला दीर्घकाळानंतर यश मिळाले होते. राजकीय क्षेत्रासह सामाजिक व सहकार क्षेत्रातही त्यांनी मोठे काम केले.
त्यांनी सरपंच म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर पंचायत समितीचे सभापती, जिल्हा मध्यवर्ती बँकचे अध्यक्ष, राज्य सहकारी बँकेचे संचालक, आमदार, खासदार अशी विविध पदे त्यांनी भूषवली. मिळालेल्या पदांचा वापर त्यांनी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी केला. समाजकारणासोबतच शेती, सहकार आणि अध्यात्मिक क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. शेती आणि अध्यात्माकडे त्यांचा ओढा होता. डॉ. शंकरराव चव्हाण यांचे ते जवळचे सहकारी होते. त्यांच्या निधनाने जुन्या पिढीतील एक अनुभवी मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनामुळे ग्रामीण भागाशी नाळ जुळलेले एक सर्वमान्य नेतृत्व हरपल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.