ठाणे – ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन (८४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी अनेक मराठी चित्रपट, नाटके, मालिका यांच्यामध्ये काम केले. सध्या ते झी मराठी वरील अगंबाई सासूबाई या मराठी मालिकेमध्ये काम करत होते. ती त्यांची अखेरची मालिका ठरली.
पटवर्धन हे मुंबईतील रिझर्व्ह बँकेत नोकरीला होते. नोकरी करीत असतानाच ते अभिनयही करत होते. त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षीच बालनाट्यात काम केले होते. हे बालनाट्य बालगंधर्व आणि आचार्य अत्रे यांनी पाहिले होते. त्यांनी १९७४ मध्ये रत्नाकर मतकरी यांच्या बरोबर अरण्यक हे नाटक केले होते. त्यात त्यांनी धृतराष्ट्राची भूमिका साकारली. त्यांनी अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केले. त्यांच्या कसदार अभिनयामुळे ते प्रसिद्ध होते. सध्या वय अधिक असल्यामुळे ते प्रत्यक्ष चित्रीकरणात सहभागी होत नव्हते. ठाण्यातील राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमीची मोठी हानी झाली आहे. त्यांना सर्वस्तरातून श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे.