नाशिक – मुंबई-आग्रा हायवेवरील हॉटेल ज्युपिटर येथे विवाह सोहळा सुरू असताना सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची बाब समोर आली आहे. या चोरीत सुमारे अकरा लाखांचा ऐवज चोरीस गेला आहे.
इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश मदनलाल बजाज (५५, रा. मिर्ची गल्ली, बालाजी मंदिर समोर, शहापूर) यांनी तक्रार दिली आहे. बजाज यांची कन्या राधिका हिचा विवाह सोहळा मंगळवारी (१ डिसेंबर) ज्युपिटर हॉटेल मध्ये शुभम अग्रवाल यांच्या बरोबर होता. लग्नाच्या दिवशी रात्री दहा वाजता विवाह विधी सुरू असताना बजाज व त्यांची पत्नी सरोज हे विधीसाठी स्टेजवर ब्राह्मणाच्या बाजूला बसले होते. त्यावेळी त्यांनी दागिने आणि रोख रक्कम असलेली लेडीज हॅन्ड बॅग स्टेजवरच ठेवली होती. त्याचवेळी अज्ञात चोरट्याने ही लेडीज बॅग लांबवली. बॅगमध्ये २ लाख १० हजार रुपये, सोन्याचे झुमके १५ हजार रुपये, डायमंड सेट ५ लाख रुपये, सोन्याची कॉइन १ लाख ५० हजार रुपये, चांदीचे अकरा कॉइन, सोन्याचा हार १ लाख ५ हजार रुपये आणि एक लाख रुपये रोख असा एकूण सुमारे ११ लाखाचा ऐवज होता. तो चोरट्यांनी लंपास केला. बजाज यांच्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करीत आहेत.