उत्तम संदर्भसाधनांच्या निर्मितीस अर्थसहाय्य करण्याच्या योजनेंतर्गत “सिंधुदुर्गातील रानभाज्या” या पुस्तकाला अर्थसाहाय्य करण्यात येणार असून वनस्पतीशास्त्र आणि मराठी भाषा यांचा अनोखा मिलाफ या पुस्तकातून वाचकांना पाहायला मिळणार असून सर्वसामान्य गृहिणी ते भाषेचे अभ्यासक या सर्वांना हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.
प्रशिक्षण वर्ग वाढविणार
महाराष्ट्रात नोकरीनिमित्ताने वास्तव्यास असलेल्या विविध आस्थापनांमधील अमराठी भाषकांना मराठीचे प्रशिक्षण देणारे वर्ग राज्य मराठी विकास संस्थेतर्फे घेतले जातात. त्यांची संख्या आता वाढवली जाणार आहे. महाराष्ट्रात सर्व शिक्षणमंडळातील अभ्यासक्रमांमध्ये आता मराठी अनिवार्य करण्यात आलेली आहे हे लक्षात घेता CBSC व ICSC बोर्डाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील अशा सुलभ संदर्भसाहित्याची निर्मिती राज्य मराठी विकास संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. संस्थेतर्फे यापूर्वी राबविलेल्या “मायमराठी” या अमराठी भाषकांना उपयुक्त ठरलेल्या पाठ्यक्रमांसारखे नवनवीन उपक्रम याअंतर्गत साकारण्यात येणार आहेत.
लोककला उपलब्ध होणार
मराठी भाषा-साहित्य-संस्कृती याविषयांवर काही दशकांपूर्वी मुंबई दूरदर्शनवरून प्रदर्शित झालेले व लोकांना आवडलेले विविध कार्यक्रम पुन्हा एकदा लोकांना पाहायला व अनुभवायला मिळावेत यासाठी मुंबई दूरदर्शनच्या सहकार्याने संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जावेत, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील ९ विद्यापीठांच्या सहकार्यांने महाराष्ट्रातील विविध लोककलांच्या डिजिटायजेशनचे काम सांस्कृतिक संचालनालयाने पूर्ण करत आणलेले आहे. ते सर्व सांस्कृतिक संचालनालयाच्या सहकार्याने लोककला अभ्यासक, आस्वादक, नवीन पिढीतील कलावंत तसेच सर्वसामान्य जनतेसाठी राज्य मराठी विकास संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.