मुंबई – शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटिस बजावल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसैनिकांनी थेट ईडी कार्यालयाबाहेरच भाजपचा फलक लावला आहे. ईडी कार्यालय हे भाजपचे प्रदेश कार्यालय असल्याची टीका या माध्यमातून शिवसेनेने केली आहे. भाजपकडून ईडीचा वापर राजकारणासाठी केला जात असल्याचा आरोपही शिवसेनेने केला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातील युद्ध आक्रमक झाल्याचे स्पष्ट होत आहे.
संजय राऊत यांनी केले हे आरोप
खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
- राजकीय विरोधकांना संपविण्यासाठी भाजप ईडीच्या आडून वार करीत आहे
- सरकारी संस्थांचा वापर करावा लागणे हे भाजपचे अपयश आहे.
- आम्ही ईडीच्या नोटिशीला घाबरत नाही
- आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही
- वर्षभरात शरद पवार, एकनाथ खडसे, प्रफुल्ल पटेल, प्रताप सरनाईक यांना ईडीची नोटीस आली
- घरातील महिला व मुलांना लक्ष्य करणे ही नामर्दानगी आहे
- भाजपची ही खेळी त्यांच्यावरच उलटणार आहे
- वर्षा राऊत चौकशीला उपस्थित राहतील किंवा नाही याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रा,्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते निर्णय घेतील
- आमच्या नोटिशीत काय लिहीलंय हे भाजपला कसं कळालं, ईडीने भाजपशी की भाजपने ईडीशी हातमिळवणी केली