नाशिक – गेल्या दहा महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या कालिदास कला मंदिराचा ३ जानेवारील पडदा उघडला. निमित्त होते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमाच्या अनुषंगाने क्रांतिसूर्य हिंदी नाटकाचे सादरीकरण. या नाटकाच्या दरम्यान सप्तर्षी माळी लिखित ज्ञानज्योती (बालनाट्य) या पुस्तकाचे प्रकाशन जोतिबा फुले- सावित्रीबाईंची भूमिका करणारे कलावंत योगेश वाघ- विनिता मोडक तसेच या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक, निर्माता राजेश शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. अक्षरबंध प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
या वेळी माळी सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत, जोश फाऊंडेशनचे योगेश कमोद, अक्षरबंधचे प्रकाशक प्रवीण जोंधळे, विभागीय वन अधिकारी लोणकर. सुहृता कमोद यांच्या प्रमुख उपस्थितीसह क्रांतिसूर्य या नाटकाचे सर्व कलावंत व्यासपीठावर उपस्थित होते. थोरांचे विचार घराघरांत पोहोचविण्यासाठी नाटक आणि पुस्तक हे माध्यम महत्त्वाचे काम करीत असतात. त्याचप्रमाणे सप्तर्षी माळी यांनी लिहिलेले ज्ञानज्योती हे पुस्तकही सावित्रीबाईंचे विचार घराघरांत पोहोचविण्याचे काम करेल, असा विश्वास व्यक्त करताना ज्ञानज्योती पुस्तक हे घराघरात असले पाहिजे, असे नाट्य लेखक- दिग्दर्शक राजेश शर्मा यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची आज समाजाला गरज असून, नव्या पिढीसाठी ज्ञानज्योती हे पुस्तक अतिशय उपयुक्त असल्याचे विजय राऊत यांनी सांगितले. योगेश कमोद यांनी प्रास्ताविकात लेखक सप्तर्षी माळी यांची व त्यांच्या साहित्याची ओळख करून दिली. या वेळी प्रवीण जोंधळे यांनी सांगितले की क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ज्ञानज्योती या पुस्तकात सावित्रीबाईंच्या जीवनावरील काही निवडक प्रसंग लेखकाने सुंदररीत्या मांडले आहे. सप्तर्षी माळी यांच्या इतर पुस्तकांप्रमाणे हेही पुस्तक राज्यभर लोकप्रिय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ज्ञानज्योती या पुस्तकाचे मुखपृष्ठ चांदवडचे प्रसिद्ध चित्रकार विष्णू थोरे यांनी रेखाटले आहे. ज्ञानज्योती हे सप्तर्षी माळी हे यांचे हे तिसरे पुस्तक असून, याआधी अक्षरबंध प्रकाशनातर्फे निमित्त व फिंद्री कथासंग्रह प्रकाशित करण्यात आले आहे, या दोन्ही पुस्तकांची पहिली आवृत्ती काही दिवसांत संपली आहे. सप्तर्षी माळी यांच्या साहित्याला आतापर्यंत नऊ पुरस्कार मिळाले असून, त्यात पाच राज्यस्तरीय पुरस्कारांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाला नगरसेविका माधुरी बोलकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी, माळी सेवा समिती व जोश फाऊंडेशचे पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेल्या कालिदास कला मंदिरात प्रथमच क्रांतिसूर्य या नाटकाचा प्रयोग होत असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. कोरोनासंदर्भात असलेले सर्व नियम पाळून जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित हे नाटक ४० कलावतांनी सादर केले.