नाशिक – सकाळच्या सुमारास जॉगिंगसाठी गेलेल्या युवतीचा घंटागाडीच्या धक्क्यात मृत्यू झाला आहे. रोशनी जैस्वाल या असे मृत युवतीचे नाव असून सातपूर परिसरात ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशनी जैस्वाल आणि तिचा मित्र हे दोघे सकाळी जॉगिंगसाठी घराबाहेर पडले होते. जॉगिंग सुरू असतानाच पाठीमागून एका ट्रॅक्टर ट्रॉलीला टो लावून येणाऱ्या मागच्या घंटागाडीचा रोशनीच्या पायाला जोरदार धक्का लागला. त्यामुळे रोशनी खाली पडली त्याचवेळी तिच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. डोक्यातून रक्तस्राव सुरू झाल्याने तिचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी दोन्ही ट्रॅक्टर आणि ट्रॉली चालक शामराव बागुल आणि अशोक नेटावटे यांच्याविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश हांडे यांनी दिली आहे.