नाशिक – ज्येष्ठ आहारतज्ज्ञ जगन्नाथ दीक्षित हे स्वतः महापालिकेच्या सिरो सर्वेक्षणात (अँटी बॉडी टेस्टिंगमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी सर्वेक्षणाची पाहणी केली. अनेक घरांमध्ये जाऊन त्यांनी पथकासोबत काम केल्याने ही बाब रविवारी विशेष चर्चेची ठरली.
नाशिक महानगरपालिकेने शहरात अँटी बॉडी टेस्टींग सुरू केले आहे. आज दुसऱ्या दिवशी २ हजार २४६ जणांची तपासणी करण्यात आली. ही तपासणी उद्या ११ जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहे. मनपा कार्यक्षेत्रामध्ये अँटी बॉडी टेस्टींग सुरू असतांना शासकीय महाविद्यालय, औरंगाबाद येथील डॉ. जगन्नाथ दिक्षीत हे स्वतः उपस्थित राहिले. ही तपासणी शास्त्रीय पद्धतीने व योग्य रितीने होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, कार्यरत पथकाचे मनोबल वाढविले. महापौर सतीश कुलकर्णी, मनपा पदाधिकारी, नगरसेवक, नागरिक आदींचे तपासणी मोहिमेत सहकार्य लाभत आहे, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली आहे.