नांदेड – नांदेड आणि लातूर जिल्ह्याच्या काठावर असलेला मुखेड तालुक्यातील शंभर बेडचे कोविड केअर सेंटर. रोज नित्य-नियमाप्रमाणे सकाळी इथे उपचार घेणारे बाधित उठतात. प्रातक्रिया आटोपून ही मंडळी एका वेगळ्या गोष्टीसाठी अतुरतेने वाट पाहत असतात.
मुखेड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली डॉ. संतोष टांकसाळे व त्यांची टीम कार्यरत असलेल्या या सेंटरचे समुपदेशक शौकतअली मदार बेग बरोबर ९ वाजता या सर्वांमध्ये दाखल होतात. सुरुवातीचा एक तास योगा आणि प्रार्थनेच्या रुपात तो सुरु करतो. दीर्घ श्वासाच्या काही क्रिया तो घेतो. एरवी योगाच्या साध्या छोट्या क्रियेपासून जे बहूसंख्य लोक दूर असतात त्यांच्यासाठी थोडे बहुत कुतुहल जागे होते. जे थोडे बहुत शिकलेले आहेत ते लोकं काही प्रश्न उपस्थित करतात. अशांना समजवत व्यायामाचा हा तास पूर्ण होतो. यात सारे बाधित ज्याची वाट पाहत असतात ती प्रार्थना जवळ येते. या बाधितात आठव्या वर्गात शिकत असलेली कु. संजीवनी काशिनाथ बोडके ही मुलगी प्रार्थनेला सुरुवात करते. नकळत सगळ्यांचे हात जोडले जातात, डोळ मिटतात आणि शब्द सुरु होतात “हीच अमची प्रार्थना अन् हेच अमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे..!”
“देगलूर विभागात असलेल्या ग्रामीण भागात अजूनही लोक कोविड-१९ ला गंभीरतेने घेत नाही. खेड्यांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. इथले बहुसंख्य लोक मास्क खिशात ठेवतील पण वापरणार नाहीत. या लोकांनी आता स्वत:हूनच वर्तनात बदल आणून योग्य ती सुरक्षा घेतली पाहिजे” अशी अपेक्षा इथले उपविभागीय दंडाधिकारी शक्ती कदम यांनी सांगितले. ग्रामीण भागाच्या तुलनेत शासनाला जे काही शक्य होत आहे त्यापरिने आम्ही वैद्यकीय सेवा सुविधा इथे उपलब्ध केल्या आहेत. वेळप्रसंग पडल्यास आव्हानात्मक स्थितीतही आम्ही पूर्ण क्षमतेने कार्य करु, असा विश्वास त्यांनी दिला. मुखेडमध्ये सद्यस्थितीत १०० बेडचे कोरोना केअर सेंटर, ऑक्सिजनची सुविधा असलेले ४० बेड, आयसीयूमध्ये १० बेड उपलब्ध आहेत. शिवाय आयटीआयची इमारत आम्ही ताब्यात घेतली असून यात ५०० बेडची क्षमता आम्ही तयार करत असल्याचे त्यांनी सांगितले.