नाशिक – नाशिक रोडच्या प्रभाग क्रमांक २० मधील जेतवन नगर येथील मनपा नर्सरीच मोठीच दुरवस्था झाली आहे. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे ही नर्सरी दुर्लक्षित असून तिला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळेच हा नर्सरीचा विकास पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) या तत्त्वावर करणार असल्याची माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली आहे.
जेतवन नगर नर्सरी पीपीपी तत्वानुसार विकसित करण्याकरिता महासभेने मान्यता दिली आहे. २०१७ च्या विकास आराखड्यात या जागेवर वैद्यकीय सुविधांचे आरक्षण आहे. ही जागा ३४५५ चौरस मीटर असून प्रत्यक्ष मोजणी नुसार २७ हजार ६८७ चौरस मीटर आहे. पैकी नर्सरीची जागा १४४२० चौरस मीटर गार्डन तसेच जॉगिंग ट्रॅक ६३०० चौरस मीटर आणि उर्वरित जागा ६९६० चौरस मीटर मध्ये निसर्गोपचार केंद्राची जागा विकसित केलेली आहे. सदरच्या जागेस दोन्ही बाजूनी अठरा मीटर व बारा मीटर डीपी रोड विकसित आहे. याठिकाणी सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यात येऊन हर्बल पार्क व महापालिकेची अत्याधुनिक नर्सरी विकसित करता येणार आहे.
हर्बल पार्क
याठिकाणी शहरातील एक आकर्षक हर्बल पार्क विकसित केल्यास शैक्षणिक सहली, पर्यटन, मनोरंजन केंद्र यांना
देखील चालना मिळणार आहे. यासाठी महापालिकेला कुठलाही खर्च न होता प्रवेश आकारणी करातून मनपास आर्थिक फायदा होणार आहे. साधारणत: ४० ते ५० लाख रुपयांची महापालिकेची आर्थिक बचत होणार आहे. यासंदर्भात लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे महापौर म्हणाले.