नवी दिल्ली – बऱ्याच दिवसांपासून आर्थिक पेचप्रसंगात अडकलेली खासगी विमान कंपनी ‘जेट एअरवेज’ लवकरच व्यवसायात परतणार असल्याचे दिसते आहे. लंडनची कलरॉक कॅपिटल आणि गुंतवणूकदार मुरारीलाल जालान यांचा समावेश असलेल्या कन्सोर्टियमने जेट एअरवेजसाठी बोली जिंकली आहे.
या बाबत जेट एअरवेजच्या रिझोल्यूशन प्रोफेशनलचे (आरपी) आशिष चवचरिया यांनी अधिकृत माहिती दिली आहे. आईबीसीच्या सेक्शन ३०(४) अन्वये कालरॉक कॅपिटल आणि गुंतवणूकदार मुरारीलाल जालान यांच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. तसेच बोली लावण्यासाठी अंतिम स्तरावर काही गुंतवणूकदारांशी चर्चा सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, जेट एअरवेज कमिटी ऑफ लेनडर्स (सीओसी) ची १७ वी बैठक नुकतीच झाली असून अर्जदारांनी सादर केलेल्या अंतिम प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. १७ ऑक्टोबरला ऑनलाईन पद्धतीने मतदान झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यानुसार मुरारीलाल जालान आणि फ्लोरियन फ्रॅच यांनी सादर केलेल्या ठरावाच्या योजनेस मान्यता देण्यात आली. जेट एअरवेज खरेदी करण्यासाठी कोलोरॅक कॅपिटलच्या नेतृत्वात असलेल्या कन्सोर्टियमशिवाय हरियाणाचे फ्लाइट सिम्युलेशन टेक्निक सेंटर आणि अबू धाबीच्या इम्पीरियल कॅपिटल इन्व्हेस्टमेंट एलएलसी यांचा समावेश आहे. त्यामुळे जेट एअरवेज आता पुन्हा कमबॅक करणार असल्याचे दिसते आहे.