नवी दिल्ली – केंद्र सरकार मनुष्यबळ, प्रशिक्षण, निरीक्षण यामध्ये क्षमतावृद्धी करण्याचे नियोजन करत आहे. जुलै २०२१ पर्यंत ४०० ते ५०० दशलक्ष डोस २० ते २५ कोटी लोकांना देण्यात येतील, असे प्राथमिक नियोजन आहे. हे नियोजन निश्चित करताना कोविड-१९ रोगासंबंधीच्या प्रतिकारशक्ती आकड्यांवरही (इम्युनिटी डेटा) सरकार लक्ष ठेवून आहे. असे आरोग्यमंत्री डॉ. हर्षर्वधन यांनी सांगितले आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी ‘संडे संवाद’च्या माध्यमातून समाज माध्यमांवरील विविध प्रश्नांना उत्तरे दिली. बऱ्याच प्रश्नकर्त्यांनी आजच्या भागात कोविड लस या संकल्पनेवर भर दिला. मंत्र्यांनी अतिशय संयमपणे कोविडसंदर्भात प्लाझ्मा थेरपीचा वापर, २०२५ पर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन, कोविड परिस्थिती लक्षात घेता देशातील शाळा सुरु करण्याविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.
लस वितरणाला प्राधान्य देण्याच्या प्रश्नांवर, डॉ हर्ष वर्धन यांनी सांगितले की, आरोग्य मंत्रालय सध्या एक प्रारूप तयार करीत आहे ज्यामध्ये राज्यांकडून लस प्राप्त करण्यासाठी प्राधान्य लोकसंख्या गटांची यादी, विशेषत: कोविड-१९ च्या व्यवस्थापनात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी सादर करण्यात येईल.
आघाडीवरील कर्मचारी यात शासकीय तसेच खासगी क्षेत्रातील डॉक्टर्स, नर्स, निम-वैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, निगराणी अधिकारी आणि इतर अनेक व्यावसायिक श्रेणीतील कर्मचारी जे मागोवा, चाचणी आणि रुग्णांच्या उपचाराच्या कामाशी संबधित होते. ऑक्टोबर अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि राज्यांना शीत साखळी सुविधा आणि गट पातळीवरील इतर संबंधित पायाभूत सुविधांविषयी मार्गदर्शन करण्यात येईल.
ते पुढे म्हणाले की, नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही के पॉल यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समिती सर्व प्रक्रियेचे नियोजन करत आहे. लस खरेदी ही केंद्रीकृत पद्धतीने होणार आहे आणि ज्यांना सर्वात जास्त आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत पोहचेपर्यंत माग (रिअल टाईम ट्रॅकींग) घेतला जाईल.
एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, या समित्या देशातील विविध लसींच्या उपलब्धतेची वेळ समजून घेण्यासाठी, लस उत्पादकांकडून भारतासाठी किमान उपलब्ध डोस आणि पुरवठा साखळी व्यवस्थापनाची हमी तसेच उच्च-जोखीम गटांना प्राधान्य यावर काम करत आहेत. हे काम सुरु असून लस तयार होईपर्यंत हे काम पूर्ण होईल आणि लसीकरण कार्यक्रमाची जलद अंमलबजावणी सुनिश्चित करण्यात येईल.
डॉ हर्षवर्धन म्हणाले की लसीकरणानंतर प्रतिकूल घटना जशा इंजेक्शन दिल्यानंतर वेदना होणे, हलका ताप आणि लालसरपणा, धडधडणे, अशक्तपणा यासारख्या प्रतिक्रिया असतात आणि या घटना क्षणिक असतात, त्याचा लस संरक्षणात्मक प्रतिसादावर काही परिणाम होत नाही.
अशाच एका प्रश्नावर, त्यांनी ‘मानवी आव्हान प्रयोगा’संबंधीची नैतिक चिंता व्यक्त केली. जागतिक अनुभवानुसार या पद्धतीचा स्थापित फायदा होतो की नाही हे सिद्ध होईपर्यंत भारत अशा प्रकारच्या चाचण्या करण्याचा प्रयत्न करणार नाही. क्लिनिकल चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केलेली लस सुरक्षित आणि नोव्हेल कोरोना विषाणूविरुद्ध प्रभावी आहे याची खात्री करण्यासाठी भारताकडे ठोस प्रक्रिया आहे. चाचण्या केल्यावर, मानवी आव्हान अभ्यास मुबलक दूरदृष्टी आणि सावधगिरी बाळगून करणे आवश्यक आहे. मिळवलेल्या माहितीचे मूल्य मानवी विषयांच्या जोखमीचे स्पष्टपणे समर्थन करणारे पाहिजे, असे ते म्हणाले.