नवी दिल्ली – कोट्यवधी वाहनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात यासाठीचे धोरण जाहिर करण्यात आले आहे. यापुढे देशातील सर्व खासगी आणि व्यावसायिक वाहनांची फिटनेस टेस्ट होणार आहे. तशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. स्वेच्छेने वाहन मोडीत काढण्याचा पर्याय वाहनधारकांना लाभणार आहे.
अर्थसंकल्पात जाहिर झालेल्या धोरणानुसार, केंद्र सरकार ऑटोमेटेड फिटनेस सेंटर देशभरात सुरू करणार आहे. या सेंटरवर २० वर्षे जुन्या खासगी तर १५ वर्षे जुन्या व्यावसायिक जुन्या वाहनांची तपासणी होणार आहे. देशात हरित तंत्रज्ञानाला चालना देणे, प्रदूषण रोखणे आणि इंधनाची बचत करण्यासाठी हे धोरण प्रभावी ठरणार असल्याचा पुनरुच्चार सीतारामन यांनी केली आहे. याद्वारे इंधनाची मागणी कमी होईल. त्यामुळे इंधन आयातही घटेल, असे त्या म्हणाल्या.
काही दिवसांपूर्वीच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जुन्हा वाहनांसंदर्भातील धोरणाचे संकेत दिले होते. वाहने भंगारात काढण्याच्या धोरणाची लवकरच अधिसचना काढली जाणार आहे. १ एप्रिल २०२२ पासून या नव्या धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे.