जुन्या वादाची कुरापत काढत एकास लोखंडी सळई, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण
नाशिक : जुन्या वादाची कुरापत काढत पाच जणांनी एकास लोखंडी सळई आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. याप्रकरणी विकी संजय काळे (रा. द्वारका) याने दिलेल्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मज्जु शेख, अजहर शेख, मुनिर शेख, योगेश गरुड, मक्कु (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) अशी संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाची कुरापत संशयितांनी फिर्यादी विकीला लोखंडी सळई व लाकडी दांडक्याने मारून उजव्या पायास गंभीर दुखापत केली. लाथाबुक्यांनी तोंडावर मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
————
मोबाइल हिसकावला
नाशिक : मेनरोडकडून शालिमारकडे पायी जाणा-या व्यक्तीचा दहा हजार रुपये किंमतीचा मोबाइल दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून घेतला. याप्रकरणी नरेश बुलखीरास शहा (रा. हुंडिवाला लेन) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवार (दि. २) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शहा हे मेनरोडकडून शालिमारकडे पायी जात होते. यावेळी दोन अज्ञात व्यक्ती त्यांच्याजवळ आले झटापट करून त्यांना खाली पाडले आणि शर्टच्या खिशातील मोबाइल हिसकावून घेत पळ काढला. याप्रकरणी सहायक पोलीस निरिक्षक मोहिते तपास करत आहे.
———–
मोटारसायकल चालकाचा मृत्यू
नाशिक : भरधाव वेगाने जाणारी मोटारसायकल समोरील कंटेनरवर जावून आदळल्याने मोटारसायकल चालकाचा मृत्यू झाला. उदय दिनेश वाघ (रा. उत्तमनगर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रविवार (दि. ३) सकाळी साडेनऊच्या सुमारास उदय वाघ हा अंबड एमआयडीतील लेअर कंपनीसमोरील रस् त्याने मोटारसायकल क्र. (एमएच ४१ बीझेड २०३८) वरून भरधाव वेगाने जात होता. यावेळी नियंत्रण सुटल्याने मोटारसायकल रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर जावून धडकली. अपघातात उदयच्या डोक्यास व छातीस मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
———-
आॅटोरिक्षा चोरी
नाशिक : वडाळा गाव परिसरातून रिक्षा चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मोहम्मद फारुक हुसेन सैय्यद (रा. बागवानपुरा) यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मोहम्मद सैय्यद यांनी त्यांची रिक्षा क्र. (एचएच १५ झेड ५८९०) ही ३० डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता अजमेरी कॉलनी, वडाळा गाव येथे पार्क केली होती. यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांची ही रिक्षा चोरून नेली. या प्रकरणी सहायक पोलीस उपनिरिक्षक डी. पी. पाळदे तपास करत आहे.
———–
दोन तडीपारांवर कारवाई
नाशिक : तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात अढळून आलेल्या दोघांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. अंबड पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयित अतुल उर्फ नवख्या उर्फ केतन नारायण नाव्हकर (रा. राजर त्न नगर, सिडको) यास ताब्यात घेतले आहे. नाव्हकर याला पोलीस उपायुक्त परिमंडळ २ यांनी एका वर्षाकरिता नाशिक शहर व ग्रामीण भागातून हद्दपार केले आहे. तरीही तो सोमवारी (दि. ४) पवननगर पाण्याच्या टाकीजवळ दिसून आल्याने पोलिसांनी कारवाई केली. तसेच देवळाली कॅम्प पोलिसांनी संशयित अक्षय बलराज क्षत्रिय (रा. देवळाली कॅम्प) यास ताब्यात घेतले आहे. अक्षयला परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्तांनी वर्षभराकरिता हद्दपार केले असताना सोमवारी (दि. ४) तो देवळाली कॅम्प येथील संजय गांधी नगर येथे आढळून आला. यावेळी त्यांच्याकडे एक तलवार देखील मिळून आली म्हणून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.