मुंबई – व्हिटॅमिन डी अर्थात जीवनसत्व डचे प्रमाण कमी असल्यामुळे कोरोनाशी संबंधित धोका वाढतो, हे प्राथमिक परीक्षणात सिद्ध झालेले नाही. मात्र उन्हातून मिळणारे व्हिटॅमीन आणि आजारापासून रक्षण करण्याच्या तंत्रात नक्कीच काही तरी संबंध आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी यासंदर्भात अनेक बाबी स्पष्ट केल्या आहेत.
जागतिक स्तरावरील महामारीचा प्रसार आणि नव्या प्रकारचा वेगाने संक्रमित होणारा कोरोना विषाणू याबाबतीत व्यक्त होत असलेली चिंता लक्षात घेऊन तज्ज्ञांनी सांगितले आहे की, व्हिटॅमीन डीच्या गोळ्या किंवा नैसर्गिक पद्धतीने व्हिटॅमिन डी प्राप्त करणे फारसे खर्चिक नाही. त्यातच कोरोनाशी संबंधित धोक्यांचा विचार केला तर व्हिटॅमिन डीच्या गोळ्या घेण्यात फारशी जोखीमही नाही. त्यामुळे विविध सरकारांनी कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी या बाबींचाही विचार करण्यास हरकत नाही.
नवी दिल्लीतील जामिया हमदर्द विद्यापीठात स्कूल आफ इंटरडिसिप्लिनरी सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे माजी अधिष्ठाता प्रो. अफरोजुल हक यांनी म्हटले आहे की, कोरोनाशी संबंधित धोक्यांमध्ये वय, पूर्वीपासून असलेले गंभीर आजार आदी बाबींचा समावेश आहे. मात्र व्हिटॅमिन डीचे प्रमाण कमी असल्यास अधिक धोका संभवतो.
प्रो. अफरोजुल हक यांच्यासह १७० तज्ज्ञांनी या महिन्यात एक खुले पत्रही लिहीले होते. व्हिटॅमिन डीचा डोस वाढविण्याचे आवाहन करीत ‘व्हीटॅमीनडीफोरल डॉट ओआरजी’ या संकेतस्थळावर हे पत्रही पोस्ट केले होते. यात म्हटले होते की ‘व्हिटॅमिन डीचे प्रमाण कमी असल्याने कोरोनाचे संक्रमण व रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू याचे प्रमाणही वाढत आहेत’.
या पत्रात म्हटले आहे की व्हीटॅमीन डीच्या संदर्भा तातडीने आकडेवारी गोळा करण्याची गरज आहे. आतापर्यंत पुढे आलेल्या प्रकरणांचा विचार केला तर व्हीटॅमीन डीचे प्रमाण वाढल्यानंतर कोरोनाचे संक्रमण व रुग्णालयांमध्ये होणारे मृत्यू रोखता येऊ शकतात, असेही या पत्रात म्हटले आहे. पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या प्रो. विनिता बल यांनी म्हटले आहे की भारतीय लोकांमध्ये व्हीटॅमीन डीची कमतरता ही आता अत्यंत सामान्य बाब झालेली आहे. जर कुणामध्ये फारच कमतरता असेल तर त्याला औषध घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.