मिर्झापूर (उत्तरप्रदेश) – मी जिवंत आहे, हे सांगण्यासाठी भोला सिंह ही व्यक्ती जिल्हा मुख्यालयासमोर चक्क धरणे आंदोलनाला बसली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याची दखल घेतली असून या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच त्यांचे म्हणणे बरोबर असेल तर याप्रकरणी दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेशही मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी दिले आहेत. एका आठवड्याच्या आत या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल पाठवण्यास सांगण्यात आले आहे.
मडिहान तहसीलमधील अमोई गावचे रहिवासी असलेले भोला सिंह हे जिल्हा मुख्यालयासमोर ठिय्या देऊन बसले. आणि आपण जिवंत असण्याचे प्रमाणपत्र प्रशासनाने द्यावे, अशी मागणी करत होते. गेली तब्बल १५ वर्षे भोला सिंह या प्रमाणपत्राची मागणी करत आहेत. त्यांना एक भाऊ आहे. २४ डिसेंबर १९९९ रोजी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भोला सिंह यांना मृत दाखवत जमिनीसंबंधी कागदपत्रांवर त्यांच्या ऐवजी त्यांचा भाऊ राजनारायण याचे नाव टाकले. पण, त्यांच्या भावाने ही सगळी जमीन हडप करत त्यातील काही जमीन विकून टाकली.
भोला सिंह यांना याबद्दल कळल्यानंतर त्यांनी भावाला विरोध केला. पण भावाने उलट त्यांनाच फटकारत ही सगळी जमीन माझी असल्याचे सांगितले. भोला सिंह यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे याची तक्रार करूनही अद्याप याबाबत कसलीही चौकशी झालेली नाही. यामुळे गेली १५ वर्षे ते न्यायासाठी झगडत आहेत. तहसिलदारांसमोरही ते हजेरी लावतात, आपण जिवंत असल्याचे सांगतात, पण तहसीलदार याकडे लक्षच देत नाहीत. याशिवाय, जमिनीच्या कागदपत्रांवरून आपले नाव काढून भावाचे नाव टाकण्याचे प्रकरणही दाखल करून घेण्याची मागणी केली, पण याकडेही कोणीही गांभीर्याने पाहिलेले नाही. आता मुख्यमंत्र्यांनीच याची दखल घेतल्याने सर्वच प्रशासकीय अधिकारी खडबडून जागे झाले आहेत. आता तरी भोला सिंह यांना न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.