नाशिक – जिल्ह्यात ड्राय रन अतिशय व्यवस्थितरित्या पार पडलेला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की, मी स्वतः, महापालिका आयुक्त तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भेट देऊन समक्ष तशी खात्री केली. सर्वच व्यवस्था ही ऑनलाइन आहे. परंतु तरीसुद्धा गर्दीमध्ये काही गडबड होऊ नये याकरता अतिरिक्त सुरक्षेचा उपाय म्हणून आपण आपल्या जिल्ह्यामध्ये एक छोटेखानी टोकन देणार आहोत.
या टोकनमध्ये संबंधितचे नाव आधार नंबर वय असा तपशील नमूद असेल. हे टोकन एका कक्षातून दुसऱ्या कक्षात नागरिक जाईल तसतसे त्यावर टीक केली जात जाईल त्यामुळे सर्व बाबींची खात्री करूनच योग्य प्रकारे लसीकरण झाल्याची खात्री पटेल. तसेच त्या छोट्या टोकन वर पुढल्या लसीकरणची तारीख नमूद केली जाईल जेणेकरून जरी काही कारणाने त्या दिवशी त्याला एसएमएस आला नाही तरी ती तारीख लक्षात ठेवून ते नागरिक लसीकरणसाठी येतील.
केंद्रावर एखाद्या नागरिकाला त्रास झाला तरी त्याला तातडीने आवश्यक ते उपचार देण्याकरता सर्व औषधे सुद्धा केंद्रावर उपलब्ध राहणार आहेत तसेच जास्त गंभीर स्वरूपाचा त्रास झाला तर ॲम्बुलन्स द्वारे त्याला दवाखान्यात पोहोचवण्याच्या दृष्टीने देखील नियोजन करण्यात आलेले आहे. इतरही सर्व बाबींचे अत्यंत सूक्ष्म नियोजन आपण केलेले आहे. जिल्ह्यात ही संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे आणि उत्साहाने पार पडेल अशी मला खात्री असल्याचेही त्यांनी सांगितले.